“एक ही हिंदुस्थान, एक ही दस्तरखान” हा संदेश देशभर पोहोचविण्याची गरज – हाजी कलीम काझी

करमाळा (दि.१९) – हिंदू व मुस्लिम समाजातील बांधवांना गुढी पाडवा व रमजान ईद निमित्त शुभेच्छा देत “एक ही हिंदुस्थान, एक ही दस्तरखान” असा एकीचा संदेश करमाळा शहर व तालुका काझी हाजी कलीम काझी यांनी दिला आहे.
रमजान ईदनिमित्त नमाजपठण दिनांक 21 मार्च 2025 रोजी सकाळी 8.15 वाजता करमाळा शहरातील मौलाली माळ येथील ईदगाह मैदानावर होणार असल्याची माहिती हाजी कलीम काझी यांनी दिली. शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नमाजपठणानंतर शांततामय वातावरणात भक्तिभावाने देशाची एकता, अखंडता व बंधुभाव टिकून राहावा यासाठी प्रार्थना करावी. समाजातील द्वेष, मत्सर, कटुता दूर करण्यासाठी सर्व धर्मीयांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भारत हा विविध धर्मीयांचा आदर राखणारा देश असून ही परंपरा जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असेही त्यांनी नमूद केले.
याचबरोबर, दिनांक 19 मार्च 2025 रोजी साजऱ्या होणाऱ्या हिंदू नववर्ष गुढी पाडव्याच्या निमित्ताने सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. नवीन वर्ष सुख, समृद्धी व भरभराटीचे जावो, तसेच पावसाळा चांगला होऊन शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे, अशी प्रार्थना करण्यात आली.

रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना घरी आमंत्रित करून शिरखुर्म्याचा आस्वाद देत एकतेचा संदेश द्यावा, असे आवाहन करण्यात आले. “एक ही हिंदुस्थान, एक ही दस्तरखान” हा संदेश देशभर पोहोचविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विघ्नसंतोषी प्रवृत्तींचा निषेध करण्यात येईल. अशा कृत्यांना समाजाचा पाठिंबा मिळणार नाही, तसेच दोषींवर कारवाईसाठी सर्व समाज एकत्र येईल, असा इशाराही देण्यात आला. प्रशासनास सहकार्य करून ईद सण शांततेत व भक्तिभावाने साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी समीर शेख, जमीर सय्यद, मुस्तकीम पठाण, सुरज शेख, रमजान बेग, जहांगीर बेग, इकबाल शेख, इम्तियाज पठाण, आझाद शेख, फिरोज बेग, कलंदर शेख, जावेद सय्यद, शाहीद बेग, अलीम पठाण, अरबाज बेग, कलीम शेख, दिशान कबीर, खलील कुरेशी, सुपरान शेख, शाहरुख शेख, गुलाम सय्यद, कय्युम मदारी, अक्रम मदारी, दाऊद मदारी आदी उपस्थित होते.

