केम उमेद प्रभागात महिला सक्षमीकरणाला नवी गती -

केम उमेद प्रभागात महिला सक्षमीकरणाला नवी गती

0

केम(संजय जाधव): प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे व स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे असे मत उमेद अभियानाच्या केम प्रभागाच्या क्लस्टर समन्वयक विजया गायकवाड यांनी व्यक्त केले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने निंभोरे (ता. करमाळा) येथे राणीलक्ष्मी महिला ग्रामसंघच्या कार्यालयात उमेदची मीटिंग पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र शासनाच्या उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) अभियाना अंतर्गत ग्रामीण महिलांना स्वयंसहाय्यता गटांद्वारे संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले जाते. या अभियानाच्या माध्यमातून महिलांना कर्ज सुविधा, कौशल्य प्रशिक्षण आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. हे अभियान महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यांमध्ये राबवले जात आहे.

पुढे बोलताना श्रीमती गायकवाड म्हणाल्या की “आपण जिजाऊ, सावित्री आणि रमाईंच्या लेकी आहोत. आपल्यामध्ये स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची मोठी क्षमता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या अधिकारांच्या बळावर आपण नक्कीच प्रगती साधू शकतो.”  यासाठी त्या प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

करमाळा तालुक्यातील केम उमेद प्रभागात विजया गायकवाड यांची नुकतीच क्लस्टर समन्वयक (Cluster Coordinator) म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर प्रभागातील काही प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी काम सुरू केले आहे.

केम प्रभाग संघाच्या कार्यालयाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. या संदर्भात त्यांनी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संघाच्या कामकाजाला सुविधा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि उद्योजकतेसाठी विविध उपक्रम राबवण्यावर गायकवाड भर देत आहेत. महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, नियोजन, कौशल्य विकास आणि स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!