करमाळा तालुक्यात अवैध स्कूल बस व खासगी वाहनांवर कारवाई; १.४७ लाखांचा दंड वसूल

0
संग्रहित छायाचित्र

केम(संजय जाधव)— करमाळा तालुक्यातील सेल्फ फायनान्स शाळांकडून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अनधिकृत स्कूल बस व खासगी वाहनांवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकलूज यांच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात  आली आहे. शिक्षक भारती संघटनेकडून याबाबत अकलूज परिवहन कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकलूज यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ फेब्रुवारी २०२६ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत करमाळा शहर व ग्रामीण भागात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. या कालावधीत एकूण २८८ वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तपासणीदरम्यान बस, स्कूल बस तसेच इतर खासगी वाहनांचा समावेश होता. बस प्रकारातील १६५ वाहनांची तपासणी करून ५५ दोषी आढळली, तर स्कूल बसच्या ५५ वाहनांपैकी ६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. इतर ६८ वाहनांपैकी १० वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.


विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच अशा प्रकारच्या अवैध प्रवासी वाहतुकीवर नियमितपणे कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अनेक ठिकाणी खाजगी वाहनांवर शाळांची नावे लावून त्यांचा ‘स्कूल बस’प्रमाणे वापर केला जातो. कोणतीही परवानगी वा सुरक्षा नियम न पाळता क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते, हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ असून पालकांची फसवणूक आहे. या प्रकरणात केवळ दंड न करता संबंधित वाहनचालक, मालक तसेच शाळा व्यवस्थापनावर फौजदारी कारवाई करावी. सेल्फ फायनान्स शाळांनी नियमांनुसार अधिकृत बसच वापराव्यात व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. – विजयकुमार गुंड, तालुकाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना

विजयकुमार गुंड, 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!