“व्याजाच्या विळख्यात घरावर डल्ला-जेऊरमधील महिलेची तक्रार”

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.४ : जेऊर येथे सावकारीच्या विळख्यात सापडलेल्या एका महिलेचे घरच सावकाराने हडप केल्याची फिर्याद करमाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली.
याबाबत सुषमा विजय वनकळस (वय ४२, रा. जेऊर) यांनी ३० मार्च २०२६ रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात त्यांनी माहटले, की सुमारे सहा वर्षांपूर्वी त्यांनी गावातील रुक्मिणी किसन माने यांच्याकडून १० हजार रुपये १० टक्के मासिक व्याजाने घेतले होते. सुरुवातीला त्यांनी नियमितपणे दरमहा व्याज भरले, मात्र काही काळानंतर व्याज थकल्यावर सावकारांकडून पुन्हा नवीन कर्ज दाखवून त्यावरही व्याज लावण्यात आले. अशा प्रकारे ‘व्याजावर व्याज’ लावत रक्कम वाढवत नेण्यात आली. १० हजारांपासून सुरू झालेला हा व्यवहार पुढे २० हजार, त्यानंतर पुन्हा त्याच रकमेवर व्याज असे करत करत अखेरीस एक लाख रुपयांपर्यंत पोहोचला.

फिर्यादी महिलेने मोलमजुरी करून वेळोवेळी व्याजाचे पैसे दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत त्यांनी सुमारे ७ लाख रुपये व्याज व इतर स्वरूपात दिले आहेत. तरीही संबंधित सावकार व त्यांच्या कुटुंबीयांकडून अजूनही ५ लाख ५० हजार रुपये थकबाकी असल्याचे सांगत वारंवार दमदाटी केली जात आहे. व्याज व मुद्दल थकल्याच्या कारणावरून दिनांक ८ जुलै २०२० रोजी फिर्यादीकडून त्यांच्या राहत्या घराचा (जागा क्र. १६९/अ/२ पैकी ५४२ चौ.फुट) दस्तऐवज करून घेण्यात आला. या व्यवहाराची किंमत १ लाख ७० हजार रुपये दाखवण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात केवळ १ लाख ५० हजार रुपयेच देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यातील रक्कमही पुन्हा व्याजाच्या नावाखाली परत घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे संबंधित घरजागा नंतर सुन पुजा सागर माने यांच्या नावावर करण्यात आली आहे.दिनांक २८ मार्च २०२६ रोजी फिर्यादी महिलेला आरोपींनी घरी बोलावून ५ लाख ५० हजार रुपये तसेच पाच वर्षांचे ७ टक्के व्याज भरण्याची मागणी करत धमकावले. पैसे न दिल्यास घराबाहेर काढून कुलूप लावण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

