खासगी शाळांबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार – संभाजी घाडगे

करमाळा : खासगी शाळांच्या संदर्भात चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेष्टा-एफ)चे नूतन जिल्हाध्यक्ष संभाजी घाडगे यांनी दिला. सोलापूर येथे मेष्टा (एफ) संघटनेच्या सभासद संस्थाचालकांची बैठक पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील सुमारे 190 संस्थाचालक उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
या मीटिंग मध्ये प्रदेशाध्यक्ष हरीश शिंदे व राज्य सचिव गणेश नीळ यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. त्यांच्या निवडी पुन्हा एकमताने करण्यात आल्या.

पुढे बोलताना ते म्हणाले श्री.घाडगे म्हणाले की, येत्या काही दिवसांत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या अडचणींबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. ज्यामध्ये पुढील मागण्या असतील – शासनाच्या पगारी असलेल्या शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी वास्तव्यास राहणे अपेक्षित असून तसे न केल्यास त्यांचा रहिवासी भत्ता बंद करून पूर्वीचा भत्ता वसूल करावा. संबंधित शिक्षकांनी शासनाची फसवणूक केली असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तसेच शाळांची गुणवत्ता, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, एनएमएस परीक्षा आणि दहावीच्या निकालाच्या आधारेच शिक्षकांचे वेतन ठरवावे. शिक्षकांनी सादर केलेल्या मेडिकल बिलांचीही सखोल चौकशी करण्यात यावी.
स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील संस्थाचालक व शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असेही घाडगे यांनी नमूद केले. काही शिक्षक संघटना प्रशासनाच्या मदतीने स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, अशा प्रकारांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

झालेल्या बैठकीत संघटनेच्या भविष्यातील धोरणांवर चर्चा करून विविध निर्णय घेण्यात आले. संघटनेसाठी स्वतंत्र कार्यालय उभारणे, दरवर्षी आदर्श शाळा, संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार देणे, तसेच राज्यस्तरील अडचणींचे निवारण करण्यावर भर देण्यात आला. शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
संघटनेचे सर्व व्यवहार पारदर्शक ठेवण्यासह दरवर्षी मार्च महिन्यात लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे ठरविण्यात आले. शिक्षक संच निश्चितीच्या वेळी अनुदानित शाळांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचा ठरावही संमत करण्यात आला. दर महिन्याला एका तालुक्यात बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले.

नवीन पदाधिकाऱ्यांची निवड
संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी हरीश शिंदे, राज्य सचिवपदी गणेश नीळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी डॉ. संतोष वलगे, जिल्हाध्यक्षपदी संभाजी घाडगे, जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन पवार, जिल्हा सचिवपदी शरद अनंतकळवस, जिल्हा संघटकपदी गणपत मोरे, तर प्रसिद्धी प्रमुखपदी हरिश्चंद्र गाडेकर यांची निवड करण्यात आली. कोअर कमिटीमध्ये हरीश शिंदे, गणेश नीळ, अमोल सुरवसे, डॉ. संतोष वलगे आणि कृष्णदेव मदने यांचा समावेश आहे.
