अवैध वाळू वाहतूक करणारा टिपर जप्त.. -

अवैध वाळू वाहतूक करणारा टिपर जप्त..

0


करमाळा/ संदेश प्रतिनिधी

करमाळा, ता.१ :  शहरातील जामखेड चौक परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिपरवर कारवाई करत महसूल विभागाने सुमारे 7.24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बाळु अशोक शेळके ग्राम महसूल अधिकारी, करमाळा यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले,की ,14 एप्रिल 2026 रोजी रात्री उशिरा गोपनीय बातमीच्या आधारे महसूल विभागाचे अधिकारी जामखेड चौक येथे सापळा रचून थांबले होते.


रात्री सुमारे 11.50 वाजता एक अशोक लेलॅन्ड कंपनीचा टिपर (क्र. MH 45 AF 9896) संशयितरित्या येताना दिसला. वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे 6 ब्रास वाळू आढळून आली. चालकाने 3 ब्रास वाळूचा परवाना दाखवला, मात्र जीपीएस तपासणीत तो परवाना आधीच वापरलेला असल्याचे स्पष्ट झाले.


यामुळे सदर वाळू ही अवैध असल्याचे निष्पन्न झाल्याने महसूल अधिकाऱ्यांनी टिपरसह वाळू जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या टिपरची किंमत सुमारे 7 लाख रुपये तर वाळूची किंमत सुमारे 24 हजार रुपये असून एकूण 7 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी चालक जयवर्धन दैन (रा. वांगी नं. 1, ता. करमाळा) याच्याविरुद्ध शासनातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!