मुतखडा बरा करण्याच्या बहाण्याने 41 हजारांची फसवणूक; ‘मनोहर मामा’विरोधात तक्रार
करमाळा : मुतखड्याचा आजार पूर्णपणे बरा करून देण्याचे आमिष दाखवत औषधाच्या नावाखाली तब्बल 41 हजार रुपये घेतल्याप्रकरणी घोटी येथील एका तथाकथित बाबाविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलीप अजिनाथ राऊत (वय 52, रा. घोटी ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, मार्च 2025 मध्ये त्यांना मुतखड्याचा त्रास सुरू झाल्याने सोलापूर येथील फुलारी हॉस्पिटलमध्ये उपचार व ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही त्रास कमी न झाल्याने त्यांनी गावातील चर्चेनुसार घोटी येथील मठात असलेल्या मनोहर मामा भोसले यांच्याकडे उपचारासाठी भेट दिली.

दि. 20 जानेवारी 2026 रोजी मठात गेल्यानंतर सेवेकऱ्यांनी भेटीसाठी 11 हजार रुपये घेतले. त्यानंतर मनोहर मामा यांनी लाल रंगाची पावडर देत “तुमचा मुतखडा पूर्णपणे बरा करतो” असे सांगितले. काही दिवस आराम वाटल्यानंतर पुन्हा त्रास सुरू झाल्याने मी पुन्हा मठात गेले असता आणखी औषध देऊन 80 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यावेळी मी 30 हजार रुपये दिले .


तसेच दि. 6 मे 2026 रोजी शिवाजी शहाजी वाघमारे व अप्पा शिवाजी जाधव हे दोघेजण घरी येऊन “पोलीस ठाण्यात तक्रार देऊ नका, तुमचे पैसे आम्ही परत देतो,” असे सांगून दमदाटी केल्याचा आरोपही फिर्यादींनी केला आहे.
या प्रकरणी करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत.
