अमेरिकेतील विद्यापीठातून केमचा अजिंक्य तळेकर झाला पदवीधर

केम(संजय जाधव): केम (ता.करमाळा) येथील अजिंक्य अंकुश तळेकर याने अमेरिकेत उच्च शिक्षण पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अमेरिकेतील यूबी न्यूयॉर्क विद्यापीठातून (University at Buffalo, New York) बी.एस. (कॉम्प्युटर सायन्स) पदवी उत्कृष्ट गुणांसह प्राप्त केली आहे.
अजिंक्य हा केम येथील डॉ. नंदा तळेकर व डॉ. अंकुश तळेकर यांचा मुलगा असून, त्याने कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंगचा चार वर्षांचा अभ्यासक्रम अवघ्या तीन वर्षांत टॉप ग्रेड्ससह पूर्ण केला. शिक्षणादरम्यान त्याला विद्यापीठाकडून चांगली शिष्यवृत्तीही मिळाली होती. तसेच टीचर्स असिस्टंट म्हणून विद्यापीठात इंटर्नशिपची संधीही त्याने यशस्वीपणे पार पाडली. दि. १६ मे रोजी न्यूयॉर्क राज्यातील बफेलो सिटी येथे पदवीदान समारंभ पार पडला. या समारंभासाठी तळेकर परिवार देखील उपस्थिती होता.

विशेष बाब म्हणजे, वयाच्या अवघ्या २२व्या वर्षीच अजिंक्य याला न्यूयॉर्क शहरात आकर्षक पॅकेजची नोकरी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
गुणवान विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणाच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अंकुश तळेकर यांनी केले असून इच्छुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
अजिंक्य तळेकर यांच्या या यशाबद्दल केम ग्रामस्थ, तळेकर मित्र परिवार तसेच परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

