पोथरे येथे उधारीच्या पैशाच्या वादातून मारहाण-दोघांविरोधात गुन्हा दाखल

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२२ : पोथरे येथे उधारीने दिलेल्या पैशाच्या कारणावरून एका मजुरास मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात विनोद सुभाष माने (वय 38, रा. पोथरे, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले,की माझे नातेवाईक अशोक मच्छिंद्र जाधव यांच्यासोबत पैसे देणे-घेण्याचा व्यवहार सुरू होता. दिनांक 18 मे रोजी अशोक जाधव यांनी दोन-तीन दिवसांत परत देण्याच्या आश्वासनावरून माझ्याकडून 500 रुपये उसने घेतले.

त्यानंतर काल (ता. 20 ) रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास पोथरे येथील बसस्टँडजवळ मी उधार दिलेल्या पैशांची मागणी केली असता वाद निर्माण झाला. यावेळी अशोक जाधव व त्यांचा मुलगा आदर्श जाधव यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणी दरम्यान आदर्श जाधव यांनी रस्त्यावरील दगड उचलून डाव्या डोळ्याजवळ मारून जखमी केले, तर अशोक जाधव यांनी हातातील धारदार वस्तूसारख्या हत्याराने कमरेजवळ वार करून जखमी केले. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या विनोद माने यांस स्थानिक नागरिकांच्या मदतीने ॲम्ब्युलन्सद्वारे उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथे दाखल करण्यात आले. सध्या प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

