पालखी मार्गाच्या कामात अडथळा; दोघांविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा

केम(संजय जाधव): श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी परतीच्या शासन मंजूर रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करून काम बंद पाडल्याप्रकरणी केम येथील दोघांविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केम हद्दीत राजुरी ते केम मार्गावरील रस्त्याच्या कामादरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मेसर्स एल. एन. मालवीय इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे अभियंता अनिलकुमार संभुनाथ तिवारी (वय 58) हे मागील 18 महिन्यांपासून राजुरी ते केम परिसरात HAM अंतर्गत श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी परतीचा मार्गाचे काम पाहत आहेत. सदर रस्ता शासनाच्या मंजुरीनुसार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार , दि. 22 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी केम हद्दीतील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ रस्त्याचे काम सुरू असताना भरत महादेव तळेकर व लक्ष्मण महादेव तळेकर (रा. केम, ता. करमाळा) यांनी घटनास्थळी येऊन “ही जागा आमची असून येथे रस्ता करू देणार नाही,” असे म्हणत काम थांबवण्यास सांगितले. संबंधितांनी शासन मंजुरीबाबत माहिती देऊन कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा सल्ला दिल्यानंतरही दोघांनी रस्त्यावर मोठमोठे दगड टाकून मार्ग बंद केला आहे.
त्यानंतर दि. 26 मे रोजी दुपारी तहसीलदारांच्या उपस्थितीत पुन्हा काम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी जेसीबी ऑपरेटर सचिन पोळ यास शिवीगाळ करून मशीन हटवण्यास भाग पाडले तसेच “काम केल्यास बघून घेऊ,” अशी धमकी दिली आहे. तहसीलदारांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही संबंधितांनी ऐकले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी तहसीलदार कार्यालयाकडून लेखी कळविल्यानंतर अभियंता अनिलकुमार तिवारी यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
रस्ता बंद झाल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक रस्ता त्वरित मोकळा करून वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी केम ग्रामस्थांकडून होत आहे.

