चोरट्याचा ८ किमी पाठलाग करून चोरीची कार जप्त; खांबेवाडीच्या अश्रू हाके यांच्या धाडसाचा सन्मान -

चोरट्याचा ८ किमी पाठलाग करून चोरीची कार जप्त; खांबेवाडीच्या अश्रू हाके यांच्या धाडसाचा सन्मान

0

करमाळा (दि.३१): खांबेवाडी (ता. करमाळा) गावचे सुपुत्र व ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस शिपाई अश्रू सुनील हाके यांनी धाडस व कर्तव्यदक्षतेचे उत्कृष्ट उदाहरण सादर करत चोरीच्या कारचा तब्बल ७ ते ८ किलोमीटर पाठलाग करून आरोपीकडून कार ताब्यात घेतली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देऊन हाके यांचा गौरव केला.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बेळगाव येथून चोरीस गेलेली किआ सेल्टोस कार ठाण्याकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी तातडीने नाकाबंदी व शोधमोहीम सुरू केली. ही घटना १० मे रोजी घडली.

माजीवाडा परिसरात तैनात असलेल्या वाहतूक पोलिस शिपाई अश्रू हाके यांनी संशयित वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन न थांबवता वेग वाढवून पळ काढला. आरोपीने हाके यांना धडक देण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

यानंतर अश्रू हाके यांनी एका फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्याची दुचाकी घेऊन चोरीच्या कारचा पाठलाग सुरू केला. जवळपास ७ ते ८ किलोमीटर पाठलाग करत त्यांनी आरोपीला घेरण्याचा प्रयत्न केला. पाठलागादरम्यान आरोपीने बेदरकार वाहन चालवत इतर वाहनांनाही धडक देण्याचा प्रयत्न केला.

अखेर विजय गार्डन मेट्रो परिसरात आरोपीने वाहन सोडून पलायन केले. पोलिसांनी चोरीची कार ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

या धाडसी कामगिरीबद्दल ठाणे पोलिस आयुक्तांनी अश्रू हाके यांचा प्रशस्तीपत्र आणि रोख बक्षीस देऊन गौरव केला. बेळगाव पोलिसांकडूनही त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे. त्याच बरोबर करमाळा तालुक्यातून देखील अश्रू हाके यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!