कुंभारगाव येथे कत्तलीसाठी नेली जाणारी गाय पोलीसांकडून जप्त

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता. २८  : कुंभारगाव हद्दीत कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने वाहतूक केली जात असलेली गाय व टाटा ACE वाहन पोलिसांनी जप्त करत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई जिंती दूरक्षेत्रातील पोलिसांनी गोरक्षक व कर्जत पोलिसांच्या मदतीने केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिंती दूरक्षेत्र येथे कर्तव्य बजावत असताना पोलीस काॅन्स्टेबल योगेश येवले यांना राशीन-कुंभारगाव मार्गावरून लाल रंगाच्या छोटा हत्ती वाहनातून गाय नेली जात असल्याची माहिती मिळाली. संबंधित वाहनाचा राशीन येथील गोरक्षक व कर्जत पोलीस पाठलाग करत असल्याचे सांगण्यात आले.

यानंतर पोलिसांनी कुंभारगाव हद्दीतील सतीश राऊत यांच्या परिसरात जाऊन पाहणी केली असता, रस्त्याच्या कडेला लाल रंगाचा टाटा ACE Zip ( MH-12-GT-7141) उभा असल्याचे दिसून आले. वाहनात एक तपकिरी-पांढरट रंगाची गाय आढळून आली. वाहनाची समोरील काच फुटलेली होती तसेच चालकाच्या उजव्या डोळ्याजवळ दुखापत झालेली होती.

चौकशीत चालकाने आपले नाव सलीम साईबाबा सय्यद (वय 45, रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे सांगितले. गायीच्या वाहतुकीसाठी कोणताही परवाना नसल्याचे त्याने कबूल केले. तसेच सदर गाय कत्तलीसाठी नेत असल्याचेही प्राथमिक चौकशीत समोर आले.

पोलिसांनी पंचासमक्ष सुमारे ₹10 हजार किमतीची गाय व ₹1 लाख किंमतीचा टाटा ACE वाहन असा एकूण ₹1.10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. गायीसाठी चारापाणी व औषधोपचाराची योग्य व्यवस्था न केल्याचेही निदर्शनास आले.

जप्त गायीची पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील देखभालीसाठी गोशाळेत ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जखमी चालकास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथे दाखल करण्यात आले.

या प्रकरणी चालक सलीम सय्यद याच्याविरुद्ध  करमाळा पोलीसात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!