जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदन प्रतिष्ठानच्यावतीने करमाळ्यात आज भव्य वृक्षारोपण अभियान

करमाळा(दि.५)जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी आणि नंदन प्रतिष्ठान, करमाळा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. ५ जून) भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता श्री संत संताजीनगर येथे होणार असून परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

कार्यक्रमास भाजपचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.
वृक्षारोपणासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांद्वारे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत भाजप सरचिटणीस तथा नंदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेश कटारिया यांनी व्यक्त केले. तसेच या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

