दोन वर्षे उलटली, नेरले-गौंडरे रस्ता अद्याप अपूर्ण; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

0

करमाळा(दि.७): नेरले ते गौंडरे रस्त्याच्या अपूर्ण व निकृष्ट कामामुळे हा मार्ग अपघातांचा सापळा बनला असून आठ दिवसांच्या आत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक तथा नेरलेचे माजी सरपंच श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, करमाळा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेरले ते गौंडरे रस्त्याचे खडीकरण व कच्चे डांबरीकरणाचे काम होऊन सुमारे दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्याप पक्क्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. दरम्यान, झालेल्या कामावरही ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. काही विद्यार्थ्यांच्या सायकलींचे नुकसान झाले असून त्यांना सायकल डोक्यावर घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. लवकरच शाळा सुरू होणार असल्याने नेरलेहून गौंडरेकडे जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.



याशिवाय करमाळा, परांडा व बार्शी येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. परांडा ही जवळची बाजारपेठ असल्याने नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

अंदाजपत्रकानुसार काम न झाल्याचा आरोप

भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे की, सन २०२१ मध्ये तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकानुसार काम करण्यात आले. मात्र त्यानंतरच्या बदललेल्या परिस्थितीनुसार नव्याने अंदाजपत्रक तयार करून दर्जेदार काम करणे आवश्यक होते. रस्त्याच्या कामामध्ये खोदाई, साईड गटार, भराव, मुरमाचा थर, त्यावर तीन इंच जाडीचे दोन स्तरांचे खडीकरण आणि त्यानंतर डांबरीकरण अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तसे काम न झाल्यामुळे रस्ता अल्पावधीतच खराब झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आंदोलनाचा इशारा

नेरले-गौंडरे रस्त्याचे काम तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आठ दिवसांनंतर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!