केम–चिखलठाण विद्युत लाईनच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी - कुंकू कारखानदारांची मागणी -

केम–चिखलठाण विद्युत लाईनच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी – कुंकू कारखानदारांची मागणी

0
कुंकू कारखानदार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर येथील महावितरणचे अभियंता माने यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले

केम(संजय जाधव):करमाळा तालुक्यातील केम गाव हे कुंकू उद्योगासाठी प्रसिद्ध असून येथे सुमारे 20 ते 25 कुंकू कारखाने कार्यरत आहेत. या उद्योगांसाठी सातत्यपूर्ण व दर्जेदार वीजपुरवठ्याची आवश्यकता असल्याने 33 केव्ही विद्युत लाईन मंजूर करण्यासाठी कुंकू कारखानदार असोसिएशनने वारंवार पाठपुरावा केला होता.

या मागणीसाठी केम गाव बंद ठेवून जेऊर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषणही करण्यात आले होते. त्यानंतर आमदार नारायण पाटील व खासदार धैर्यशील मोहिते यांच्या प्रयत्नांतून केमसाठी 33 केव्ही विद्युत लाईन मंजूर झाली. या लाईनचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू होते.

मात्र, 5 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या लाईनवरील काही विद्युत खांब कोसळल्याने केम ग्रामस्थांना दोन दिवस अंधारात राहावे लागले. या घटनेनंतर संबंधित कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.



फाउंडेशनच्या कामावर ग्रामस्थांचा आक्षेप

कुंकू कारखानदार असोसिएशन व ग्रामस्थांनी घटनास्थळी पाहणी केली असता, खांबांच्या फाउंडेशनचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळेच वाऱ्याच्या वेळी खांब कोसळल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे.

यासंदर्भात कुंकू कारखानदार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर येथील महावितरणचे अभियंता माने यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले आहे. संबंधित विद्युत लाईनच्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करण्यात यावी. अन्यथा केम ग्रामस्थांशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असा इशारा कुंकू कारखानदार असोसिएशनने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!