राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीला वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा कृषी निर्यात पुरस्कार

करमाळा(प्रतिनिधी): वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने कृषी दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात करमाळा तालुक्यातील राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीला ‘कृषी निर्यात पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, प्रतिष्ठानचे सचिव दीपक पाटील, अध्यक्ष डॉ. राजेंद्र बारवाले, कार्याध्यक्ष अविनाश नाईक, डॉ. बकुल पटेल, माजी आमदार मुश्ताक अंतुले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत तुळवे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ३५ हजार रुपयांचा धनादेश असे होते.
कंपनीच्या यशस्वी वाटचालीला राज्यस्तरीय मान्यता
करमाळा तालुक्यातील ७५६ सक्रिय शेतकऱ्यांना एकत्र आणून ३३ लाख रुपयांचे भागभांडवल आणि ५ कोटी रुपयांहून अधिक उलाढाल गाठणारी राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी अल्पावधीतच राज्यातील अग्रगण्य शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी एक ठरली आहे. नाबार्ड व कृषी विभागाच्या १० हजार एफपीओ प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या कंपनीने डिसेंबर २०२२ मध्ये पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने दुबईला केळीचा कंटेनर यशस्वीपणे निर्यात करून नवा इतिहास घडवला.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने १५ ऑगस्ट २०२३ रोजी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी कंपनीच्या अध्यक्षांना विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित केले होते. तसेच विप्रो, ट्रायडेंट आणि एस. के. यांसारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय निर्यातदार कंपन्यांशी थेट व्यावसायिक करार करून कंपनीने केळीच्या जागतिक पुरवठा साखळीत आपले स्थान मजबूत केले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
कंपनीने वॉटर संस्थेच्या सहकार्याने करमाळा–कुडूवाडी मार्गावरील स्वतःच्या एक एकर जागेत अत्याधुनिक काढणीपश्चात प्रक्रिया केंद्र उभारले आहे. येथे बायोमासवर आधारित कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित हवामान केंद्र, ६० टन क्षमतेचा वजनकाटा तसेच ड्रोन आणि आधुनिक कृषी अवजारे बँक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे उत्पादनाची गुणवत्ता, शेल्फ लाईफ आणि निर्यातक्षमता वाढण्यास मोठी मदत झाली आहे.
प्रस्ताव न मागवता पुरस्काराचा बहुमान
राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या कृषी निर्यात, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकरी सक्षमीकरणातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या पुरस्कार समितीने कोणताही प्रस्ताव न मागवता हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला. त्यामुळे कंपनीच्या यशस्वी वाटचालीवर आणखी एक मानाचा शिक्का उमटला आहे.

