वाशिंबे येथील भैरवनाथ मंदिरात चोरी- २ लाख ६४ हजाराचे दागिने व मूर्ती लंपास

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२५: वाशिंबे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून देवाच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने तसेच जोगेश्वरी देवीची पितळी मूर्ती असा २ लाख६४ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला आहे.ही घटना २१ जुन च्या मध्यरात्री झाली आहे.
या प्रकरणी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष नानासाहेब बाळासाहेब झोळ यांनी फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले, की २१ जून २०२६ रोजी रात्री मंदिराची पूजा झाल्यानंतर मंदिर कुलूपबंद करण्यात आले होते. मात्र २२ जून रोजी पहाटे मंदिर उघडण्यासाठी पुजारी संजय शिंदे आले असता मंदिराच्या दरवाज्याचे कडी-कोयंडे तोडलेले दिसून आले. यानंतर देवस्थान पदाधिकारी व ग्रामस्थांनी मंदिरात पाहणी केली असता देवाच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने व जोगेश्वरी देवीची पितळी मूर्ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये सोन्याच्या मुद्या, चैन, फुले, नथ, मणीमंगळसूत्र, चांदीच्या पादुका, चांदीचा हार तसेच जोगेश्वरी देवीची पितळी मूर्ती यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख ६४ हजार रुपये आहे
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करून चोरीस गेलेल्या वस्तू हस्तगत करण्याची मागणी करण्यात येत आहे. करमाळा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


