आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त केम येथील मतिमंद निवासी विद्यालयात खाऊ वाटप

केम (संजय जाधव) : विधानपरिषदेचे आमदार बच्चू कडू यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त केम येथील श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ, मंगळवेढा संचलित श्री नागनाथ मतिमंद निवासी विद्यालयात खाऊ वाटप व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम प्रहार संघटना करमाळा तालुक्याचे अध्यक्ष संदीप तळेकर व केममधील युवकांच्या पुढाकाराने पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए.पी. ग्रुपचे संस्थापक अच्युत पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सागर दौंड, महावीर तळेकर, आनंद शिंदे तसेच आदिजण उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर चव्हाण यांनी आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. जाधव यांनी विद्यालयाच्या कार्याची तसेच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी संदीप तळेकर यांनी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांग, वंचित आणि गरजू घटकांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजसेवेचे व्रत कायम ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यात विद्यालय अथवा विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास प्रहार संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा देत प्रोत्साहनही देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन चव्हाण यांनी मानले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक नाळे, आदेश सपकाळ, प्रथमेश पवार, विद्यालयातील कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच सागर कुरडे, योगेश ओहोळ, सचिन तळेकर, बापू नेते तळेकर, भारत नागणे, सुनील चव्हाण, राजेंद्र देवकर, सागर गायकवाड, भाजप सरचिटणीस धनंजय ताकमोगे, केळी व्यापारी गीते तसेच केम गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत अशा समाजहिताच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

