बुलेट चालकाची वृद्धाला धडक

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता.१६: शहरातील पोस्ट ऑफिससमोरील रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या बुलेट चालकाने पाठीमागून धडक दिल्याने ८६ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार रविवारी (दि. १२ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला.

पांडुरंग किसन गिरी (वय ८६, रा. मौलालीमाळ, करमाळा) हे पोस्ट ऑफिससमोरील रस्त्याने बसस्थानकाच्या दिशेने चालत जात असताना, बुलेट चालक तेजस बबन गुंड रा. देवळाली याने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.


प्रकृती गंभीर असल्याने पांडुरंग गोसावी यांना पुढील उपचारासाठी न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे.
यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
