ग्रामीण भागात विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासात वीजपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे अडथळे निर्माण होत असल्याने रात्रीच्या वेळेत अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नेरले येथील माजी सरपंच औंदुबरराजे राजेभोसले पाटील यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)च्या जेऊर शाखेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील सुमारे ९० टक्के कुटुंबे शेतीवर अवलंबून असून शेतीसाठी तीन फेज वीज चार ते सहा तास उपलब्ध होते. तर सिंगल फेज वीज रात्री उशिरा सुरू होऊन सकाळी बंद केली जाते. त्यामुळे शेतात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळेत अभ्यास करता येत नसून त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

आजच्या काळात शिक्षणाला विशेष महत्त्व असून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनाही रात्रीच्या वेळी शेतीची कामे करण्यासाठी तसेच पिकांचे चोरी व वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत वीज उपलब्ध असणे गरजेचे असल्याचेही म्हटले आहे.
महावितरणने तांत्रिक बाबींचा विचार करून अभियंत्यांच्या माध्यमातून योग्य उपाययोजना करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रात्री अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.


