करमाळा एमआयडीसीला पायाभूत सुविधांची प्रतीक्षा; उद्योगविकासासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवेदन

0

करमाळा(प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसीमध्ये अद्यापही आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने औद्योगिक विकास ठप्प असल्याची बाब कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निदर्शनास आणून देत, एमआयडीसीमध्ये तातडीने वीज, पाणी, अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

करमाळ्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) महाविद्यालयाच्या नामांतर कार्यक्रमानिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा करमाळा दौऱ्यावर आले असता, मांगी ग्रामपंचायतीचे सदस्य सुजित बागल यांनी त्यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात करमाळा–मांगी मार्गालगत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) साठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या औद्योगिक क्षेत्रात आजपर्यंत वीज, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या परिसरात कोणताही उद्योग, व्यवसाय किंवा उत्पादन युनिट उभारले गेले नसल्याने औद्योगिक विकासाला अपेक्षित गती मिळालेली नाही. परिणामी, स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

करमाळा हा कृषिप्रधान तालुका असून येथे कृषिपूरक उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, लघु व मध्यम उद्योग तसेच विविध उत्पादनाधारित उद्योग उभारण्याची मोठी क्षमता असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. या क्षमतेचा योग्य वापर होण्यासाठी एमआयडीसीमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यासाठी करमाळा एमआयडीसीमध्ये वीज, पाणी, रस्ते, जलनिस्सारण आणि इतर आवश्यक सुविधा उभारण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना राबवून करमाळा तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना द्यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

या मागणीचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!