केम–टेंभुर्णी मार्गावर एसटीअभावी प्रवाशांचे हाल

केम(संजय जाधव): केम–वडशिवणे–कंदर–टेंभुर्णी मार्गावर सध्या दिवसभरात एकही एसटी बस धावत नसल्याने या मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यापूर्वी या मार्गावर करमाळा आगाराची करमाळा–टेंभुर्णी टपालगाडी सुरू होती. मात्र, ही बससेवाही काही दिवसांपासून बंद करण्यात आल्याने प्रवाशांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
टेंभुर्णी येथे जाण्यासाठी आता प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, खासगी वाहनेही नियमित उपलब्ध होत नसल्याने अनेकदा दोन ते तीन तास वाहनाची वाट पाहावी लागते. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ज्या नागरिकांकडे स्वतःची दुचाकी आहे, ते कंदरपर्यंत जाऊन तेथे वाहने लावून पुढील प्रवास करीत आहेत. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांकडे स्वतःची वाहने नसल्याने त्यांना टेंभुर्णीकडे जाणारी खासगी गाडी मिळेपर्यंत दुपारपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
वडशिवणे येथील ज्येष्ठ नागरिकांना केमच्या बाजारपेठेत येण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. एसटी सेवा उपलब्ध नसल्याने काही ज्येष्ठ नागरिकांना चक्क पायी केमपर्यंत यावे लागत असल्याची स्थिती आहे.
केमसारख्या मोठ्या गावाला जोडणाऱ्या या मार्गावर एसटी बससेवा बंद असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
बसअभावी सेवा बंद – आगारप्रमुख
याबाबत करमाळा आगारप्रमुख शिंदे यांच्याकडे बससेवेबाबत विचारणा केली असता, करमाळा आगाराकडे सध्या अपुऱ्या बस तसेच अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने संबंधित बससेवा बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
