केमचे कुंकू कारखानदार केवळ व्यवसाय करीत नसून हिंदू धर्माचे रक्षण करण्याचे कार्य करीत आहेत- ह.भ.प. संग्राम भंडारे

केम (संजय जाधव): तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरात हिंदू नववर्षापासून दर महिन्याला शिवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्यानुसार बुधवार, ९ सप्टेंबर रोजी पाटील गल्लीच्या वतीने शिवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प. संग्राम भंडारे महाराज यांचे कीर्तन झाले.
कीर्तनामध्ये त्यांनी संतवचनातील ‘आपुलिया हिता जो होसी जागता, धन्य माता पिता तयाचे… कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा’ या अभंगाचे निरूपण केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपण हिंदू म्हणून टिकून आहोत. केम येथील कुंकू कारखानदार केवळ व्यवसाय करीत नसून हिंदू धर्माचे रक्षण करण्याचे कार्य करीत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे देवावर श्रद्धा ठेवणारे आणि भगवान महादेवाचे भक्त होते. मंदिरे ही समाजाला एकत्र आणण्याचे कार्य करतात. त्याचप्रमाणे केम येथे दर महिन्याला होणाऱ्या शिवरात्र उत्सवाच्या माध्यमातून हिंदू समाज एकत्र येतो तसेच अन्नदानही केले जाते. हे केमचे भाग्य असल्याचे ह.भ.प. भंडारे महाराज यांनी सांगितले.
कीर्तनाला मृदंगाचार्य ह.भ.प. राम रेणुकर व लखन रेणुकर यांची जुगलबंदी लाभली. त्यांच्या वादनाचे भाविकांनी कौतुक केले. तसेच गायनाचार्य ह.भ.प. सांगवे महाराज यांचीही साथ लाभली.
या कार्यक्रमास श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, सदस्य, सचिव तसेच श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंत गिरी महाराज उपस्थित होते. कीर्तनानंतर पाटील गल्ली मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. शिवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी पाटील गल्ली मित्रमंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
