काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश

करमाळा (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा भाजप नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
प्रतापराव जगताप यांच्यासोबत करमाळा तालुका काँग्रेस आयचे भटक्या विमुक्त जातीचे तालुकाध्यक्ष देवराव अण्णा सुकळे, शिवसेनेचे युवक नेते संभाजी शिंदे, शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप, योगेश राखुंडे यांच्यासह काँग्रेसचे उपाध्यक्ष, पदाधिकारी, विविध शाखांचे शाखाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला.

पक्षप्रवेशानंतर बोलताना प्रतापराव जगताप यांनी भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे विचार, विकासाची भूमिका आणि पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.

प्रतापराव जगताप हे माजी आमदार नामदेवराव जगताप यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे करमाळा तालुक्यातील राजकीय घडामोडींमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

यावेळी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, करमाळा नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती राहुल भैया जगताप, भाजप मंडलाध्यक्ष काकासाहेब सरडे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, नगरसेवक रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नव्याने पक्षात प्रवेश केलेले पदाधिकारी व त्यांचे समर्थक उपस्थित होते.


