तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी - तळेकर यांचे निवेदन - Saptahik Sandesh

तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी – तळेकर यांचे निवेदन

केम (संजय जाधव): करमाळा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे करमाळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना कोणत्याही अटी न लावता सरसकट शासकीय मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी सरपंच अजित तळेकर यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे केली आहे.

करमाळा तालुक्यासह केम परिसरात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पावसाअभावी पिके करपून जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पिकांवर केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत अजित तळेकर यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करून करमाळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांना मदत देताना फार्मर आयडी किंवा अन्य तांत्रिक अटींमुळे पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत. त्यामुळे फार्मर आयडीसह इतर अटींचा आग्रह न धरता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी तळेकर यांनी केली आहे.

पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षाही अजित तळेकर यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!