करमाळा बायपास परिसरातील मांसविक्री दुकानाबाबत नागरिकांची पोलिसांकडे तक्रार - Saptahik Sandesh

करमाळा बायपास परिसरातील मांसविक्री दुकानाबाबत नागरिकांची पोलिसांकडे तक्रार

करमाळा : करमाळा बायपास परिसरातील ‘महाराष्ट्र चिकन & मटन शॉप’ येथे कथित अनधिकृत मांसविक्री, मृत जनावरांची कत्तल तसेच सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दि. २४ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात, संबंधित ठिकाणी मृत अथवा मेलेल्या शेळ्या, कोंबड्या व इतर जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी वापरले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या मांसाची मानवी सेवनासाठी योग्यता तपासली जाते का, जनावरांची पशुवैद्यकीय तपासणी केली जाते का तसेच मांसविक्री व्यवसायासाठी आवश्यक परवाने व शासकीय मान्यता आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच संबंधित ठिकाणी स्वच्छतेचे नियम, कत्तल व मांसविक्रीसंदर्भातील नियम तसेच कचरा व जनावरांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्याच्या नियमांचे पालन होते की नाही, याचीही तातडीने तपासणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात नागरिकांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा करणे, मांसविक्रीसाठी आवश्यक परवाने व शासकीय मान्यतांची तपासणी करणे, विक्री करण्यात येणाऱ्या मांसाची पशुवैद्यकीय तपासणी व आवश्यक नमुना तपासणी करणे, तसेच तक्रारीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यवसायावर लागू कायदे व नियमांनुसार कारवाई करावी, तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याचे आढळल्यास तो प्रकार तातडीने थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

error: Content is protected !!