राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू; शेतकऱ्यांसाठी विविध सवलती जाहीर - Saptahik Sandesh

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू; शेतकऱ्यांसाठी विविध सवलती जाहीर

संग्रहित छायाचित्र

करमाळा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ (पहिली कळ) लागू केला असून या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांसाठी विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा या सर्व ११ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

शासनाच्या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात येणार आहे. तसेच कृषी पंपांच्या वीज बिलाबाबतही सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. ७.५ हॉर्सपावरपर्यंत क्षमतेच्या कृषी वीजपंपांचे वीज बिल यापूर्वीच माफ करण्यात आले असून, त्यावरील वीजपंपांना संबंधित सवलत लागू राहणार आहे.
याशिवाय शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषांमध्ये शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे, आवश्यक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर करणे, तसेच टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे, अशा उपाययोजनांचा समावेश आहे.

शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी व्यवस्था करणे, जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध करून देणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे तसेच शासनाच्या निर्देशांनुसार पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू असलेल्या २६५ तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे करण्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे व जीपीएस कोऑर्डिनेट्स संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्याची कार्यवाही करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना रोख पिकांच्या नुकसानीबाबत मदत विहित कार्यपद्धतीनुसार पात्रतेप्रमाणे देण्याची तरतूद शासन निर्णयात करण्यात आली आहे.

error: Content is protected !!