करमाळा तालुक्यासाठी पाणी, आठ तास वीज व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी – माजी आमदार शिंदे यांची मागणी

करमाळा(प्रतिनिधी)करमाळा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे आणि सलग आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन केली.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनांमधील जाचक अटी व तांत्रिक त्रुटींमुळे अनेक पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. २०१७ च्या योजनेत दीड लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्जाच्या रकमेबाबत असलेल्या अटींसह विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. त्यानंतर २०१९ च्या योजनेतही अनेक शेतकरी वंचित राहिले. त्यामुळे तिन्ही योजनांतील पात्र शेतकऱ्यांच्या अडचणींचा पुनर्विचार करून जाचक अटी व तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात आणि त्यांना कर्जमुक्तीचा लाभ द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली.

दरम्यान, करमाळा तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चारा पिके आणि फळबागा वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. या परिस्थितीत बॅकवॉटर परिसरातील शेतीपंपांना सलग आठ तास वीजपुरवठा करण्याची आवश्यकता असल्याचे शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या दहिगाव सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन तातडीने सोडावे, तसेच कुकडी प्रकल्पातून करमाळा तालुक्यासाठी विशेष आवर्तन मंजूर करून त्याचा पाणीपुरवठा लवकर सुरू करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा देणे, चारा पिके व फळबागांचे संरक्षण करणे, शेतीसाठी सलग आठ तास वीज उपलब्ध करून देणे आणि दहिगाव व कुकडी प्रकल्पांची आवर्तने तातडीने सोडणे, या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!