विकासासाठी समाजाभिमूख व दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणारे नेतृत्व हवं!

निवडणूक म्हटलं की राजकारण आलं आणि राजकारण म्हटलं की नेतृत्व आलं. जो चांगलं नेतृत्व करतो तोच नेता होतो. नेत्यात काही गुण असतील तरच नेता समाजात टिकून रहात असतो. सामाजिक सर्वांगीण विकासासाठी समाजाभिमूख व दूरदृष्टी ठेवणार नेतृत्व हवं!
करमाळा शहर हे ऐतिहासिक शहर आहे. करमाळ्याचा देखणा किल्ला, आखीव रेखीव पेठांची निर्मिती, कमलाभवानीचे आगळे वेगळे मंदीर तसेच कर्तृत्ववान महापुरुषांचा वारसा आदी बाबीमुळे करमाळा शहर व तालुका इतर तालुक्यापेक्षा वेगळा आहे. याबरोबरच करमाळा शहराची नगरपालिका ही बाब विशेष महत्वाची आहे. ब्रिटीश कालावधीत सन १ मे १८६७ ला स्थापना झालेल्या या पालिकेला १५० वर्षाचा इतिहास आहे. अशा या पालिकेची मागील निवडणूक २७ नोंव्हेबर २०१६ रोजी झाली होती. सन २०२१ मध्ये कोरोना असल्याने तत्कालीन शासनाने निवडणुका पुढे ढकलल्या. त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. त्यामुळे निवडणुका झाल्या नाहीत. त्यानंतर जवळपास गेल्या अडीच वर्षापुर्वी पालिकेवर प्रशासनाची नेमणूक झाली आहे. सध्या न्यायालयाची अडचण दुर झाली, राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या असून स्थिर सरकार आले आहे. अर्थातच महायुतीला वातावरण चांगले असल्याने येत्या दोन-चार महिन्यात पालिकेची निवडणूक होण्याची अपेक्षा आहे.
आता होणारी निवडणुक ही जनमतातील नगराध्यक्षपदासाठी होणार आहे. एवढेच नव्हेतर निवडला जाणारा नगराध्यक्ष हा अडीच वर्ष ऐवजी पाच वर्षासाठी निवडला जाणार आहे. तसा निर्णय शिंदे सरकारने जुलै २०२२ मध्ये घेतलेला आहे.
निवडणूक म्हटलं की राजकारण आलं आणि राजकारण म्हटलं की नेतृत्व आलं. जो चांगलं नेतृत्व करतो तोच नेता होतो. नेत्यात काही गुण असतीलतरच नेता समाजात टिकून रहात असतो. निवडणूका काही महिन्यावर आल्यामुळे मुद्दामहून हा विषय घेतला आहे की पालिका निवडणुकीसाठी कोण नेतृत्व करू शकतो, नेतृत्व करण्याला ती व्यक्ती पात्र आहे का..?

नेतृत्व ही एक प्रक्रिया आहे. ज्यामुळे ठरावीक वेळेत लोकांना मार्गदर्शन करून व काम करण्यास प्रवृत्त करून एखादे काम पुर्ण करता येते. नेतृत्वाला थोडा अधिकाराचा किंवा स्वामित्वाचा आभास असावा लागतो. ज्यामुळे तो लोकांना प्रभावित करू शकतो व लोक त्यांच्या मताप्रमाणे वागतात. नेतेपणासाठी दोन गुण आवश्यक असतात, ते म्हणजे उत्तम वर्तुणूक व शुध्द चारित्र्य. नेत्याबद्दल अनेक विचारवंतानी आपली मते व्यक्त केली आहेत. चिनी तत्त्ववेत्ता लिओ टीझ म्हणतो.. “नेता तेंव्हाच खूप चांगला असतो, जेंव्हा लोकांना त्याचे अस्तित्व कळते. तो बरा असतो जेंव्हा लोक त्याचे ऐकतात आणि त्याला आपला म्हणतात. तो वाईट असतो जेंव्हा लोकांचे तो ऐकत नाही, तेंव्हा लोक त्याचा तिरस्कार करतात. वास्तविक पाहता चांगला नेता कमी बोलतो. जेंव्हा त्याचे काम संपते, तेंव्हा त्याचे लक्ष्य पूर्ण होते, मग लोक म्हणतात की हे सर्व आम्हीच केले.”

मॅक्स डी प्रीने या विचारवंताने नेत्याबाबत म्हटले आहे, की “नेत्याची पहिली जबाबदारी सर्वांना सत्य सांगणे व शेवटी आभार मानने ही असते. मधल्या काळात तो फक्त नोकर असतो. नेते लोक त्यांच्या धैर्यासाठी व जबाबदारी स्वत:वर घेण्याच्या ताकदीसाठी तसेच भविष्यकालीन योजनांसाठी वाखणले जातात. आजच्या नेत्यांना तर रोजच्या रोज कठीण निर्णय घेण्याच्या कामापेक्षा बऱ्याच पुढच्या गोष्टीचा विचार करावा लागतो. त्यांना सामाजिक संशोधन करावे लागते, लोकांच्या कलागुणांचे संशोधन करून त्यांची क्षमता समजून घेऊन त्यांना उभे करावे लागते. तरच नेतेपणाची धुरा यशस्वीपणे पेलली जावू शकते.”
आज करमाळा शहर व तालुक्यात चांगल्या नेत्याची उणीव आहे. सध्या संपत्ती व सत्ता या अभिलाषा सर्वदूर पसरल्या आहेत. अलीकडचे नेते त्यात गुरफटून गेल्याचे दिसते व तेथेच त्यांच्या -हासाची बीजे रुजलेली आहेत. लोक स्वातंत्र्याची भाषा बोलत असलेतरी सर्वदूर नियंत्रणे लादली जातात. लोकशाहीची भाषा वापरली जाते पण प्रत्यक्षात एकतंत्री कारभार चालतो. निस्वार्थाचा गौरव केला जातो परंतू राजकीय लोक स्वार्थीपणाने वागतात. स्वत:ला आवश्यक वाटणाऱ्या कामात ते रस घेतात व त्यामुळे समाजाच्या इच्छा – आकांक्षा धुळीला मिळतात, हे दुःखदायक आहे. पण हेही खरे आहे, की इतिहासातून हे लोक शहाणे होत नाहीत व धडा घेत नाहीत. आपण आपल्याभोवती अव्यवस्थेचा खंदक पुन्हा एकदा खोदत आहोत, असे चित्र दिसते. त्यामुळे सत्तेवर आलेल्या नेत्यांनी या सर्व बाबीचा विचार करून आपल्या कारकिर्दीत समाजाभिमूख निर्णय कसे घेता येतील; यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.
चांगले नेते आत्मनिर्भर असतात. शेक्सपियरचे एक वचन आहे. “टू थाईन ओन सेल्प बी टू ” मोठी माणसे स्वतःच्या मनाचा कौल मानतात. ते दुसऱ्याची मते किंवा प्रस्ताव यांना आपल्या आयुष्यावर कुरघोडी करू देत नाहीतच पण आपल्या विचारांवर व वागण्यावर त्याचा परिणामही होऊ देत नाहीत. श्रेष्ठ नेते नवीन गोष्टी करण्यासाठी सोप्या पध्दतीचा मोह टाळतात, खूप काम करतात व लवचिकपणा ठेवतात. वास्तविक पाहता नेत्यांनी नेहमी विनम्र असले पाहिजे. परळीचे चित्र अख्खा महाराष्ट्र पहात आहे. तिथे कशाप्रकारे नेतृत्व आहे. तिथे लोकशाही की हुकुमशाही याचा विचार केलेला बरा. नेत्याच्या बाबतीत एक बाब लक्षात घेतली पाहिजे, समाजात कुठलेही काम उत्कृष्ट पध्दतीने केले की, ते यशस्वी होतेच. करावे इतकेच लागते, की इतरापेक्षा थोडेसे पुढे जावे लागते. आणखी एक महत्वाचे म्हणजे नेत्याचा जनतेविषयीचा दृष्टीकोन नेहमी सकारात्मक पाहिजे.

याबाबत एक दोन आवळ्या-जावळ्या मुलांची गोष्ट खूपच महत्वाची आहे. दोन आवळी-जावळी मुले होती. त्यातील एक मुलगा नेहमी नकरात्मक वागत असे, आलेल्या कोणत्याही वस्तूतील तो दोष शोधत असे. काम करताना अनेक गाणी गात असे. तर दुसरा कोणत्याही बाबतीत उत्साहाने वागत असे. पालकांनी त्या गाऱ्हाणेबहाद्दर मुलाला मानोसपचार तज्ञाकडे नेले. त्यांनी बरीच चिकित्सा करून ते म्हणाले, याला चांगल्या बंगल्यात बंदिस्त ठेवा, तेथे त्याला आवडतील अशा सर्व वस्तूची व्यवस्था करा, जेणेकरून तो त्या कामात गुंतेल व त्याचा दृष्टीकोन बदलेल. पालकांनी तसे केले त्याला एका चांगल्या अलीशान बंगल्यात खाण्याच्या वस्तू, खेळणी, इतर काही साधनं ठेवली. दुरदर्शन संचासारखी करमणुकींचं माध्यमही ठेवलं. त्याचवेळी त्यांनी दुसऱ्या मुलालाही दुसऱ्या एका हॉलमध्ये बंद केले. त्याला जेवण दिले होते व त्या हॉलमध्ये फक्त चिखल व शेणच ठेवले होते. संध्याकळी ते गाऱ्हाणेबहाद्दरकडे गेले तर त्यांनी वस्तूबद्दल, खेळणीच्या रंगाबद्दल, खाण्याच्या पदार्थबद्दलचे अनेक दोष सांगितले व तो सर्वांवरच वैतागला. पालक दुसऱ्या मुलाकडे गेले तर त्याने त्या चिखलापासून अनेक वस्तू बनवल्या होत्या एवढेच नाहीतर तो त्या वस्तूला शेणाचा रंग देत होता. आलेल्या पालकांना त्यांनी मोठ्या खुषीने त्या वस्तू दाखवून अभिप्राय मागितला. थोडक्यात समाजात अन्य काय असण्यापेक्षा दृष्टीकोन महत्वाचा पाहिजे.

तालुक्यातील मागील झालेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील निवडणूकीतील निकाल पाहिलेतर बरेच संदर्भ बदललेले दिसतात. नेते कोठेही गेले तरी मतदार आपल्या विचारापासून हालत नाही, हे या निवडणूकातून सिध्द झालेले पाहावयास मिळते. एवढेच नाहीतर ज्यांना सत्ता आपल्या डाव्या हाताचा मळ वाटत होते, त्यांना मतदारांनी घरी विश्रांती घेण्याला पाठवल्याचे दिसते. जो मतदाराशी खेळतो, त्याचा खेळ येथील मतदार नक्की करतो; हे एकदा-दोनदा नव्हेतर वारंवार स्पष्ट झाले आहे. या तालुक्यात यश मिळवणे सोपे आहे, परंतू मिळालेले यश टिकवणे हीच खरी नेत्याची सत्वपरिक्षा असते, हे सत्ताधारी मंडळींना कायम लक्षात ठेवावे लागणार आहे.
ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी नामोहरण होण्याचे काही कारण नाही. राजकारणात जो टिकतो तोच यशस्वी होतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे जनमाणसात या नेतेमंडळींना टिकून राहिले पाहिजे. या तालुक्यात निवडणूकीपुरते अनेक नेते पुढे येतात, पण निवडणूकीत अपयश आले की ते जनतेपासून दूर जातात आणि त्याचा तोटा जनतेला व त्यांनाही होतो. उच्चप्रतीचे ध्येय व त्यात सातत्य असेलतर यश त्याच्या मागे धावत येत असते, अशी इतिहासात अनेक उदहारणे आहेत.

चित्रकार व्हिन्सेंट वॅन-गॉग इतका गरीब होता, की त्याला रंगाचे कुंचले घेण्यासाठी पैसे नव्हते. त्याने हाताने चित्र रंगवली. १८६० मध्ये लुई पाश्चरने कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या रॅबीज रोगावर उपाय शोधून काढला. जेंव्हा तो रोगप्रतिबंधक लस बनविण्याच्या कामात मग्न होता, तेंव्हा त्याच्या तीन मुली एकापाठोपाठ एक मरण पावल्या, पण या दुर्दैवी घटनांनी सुध्दा तो त्याच्या कामापासून विचलित झाला नाही. थॉमस एडिसनला त्याच्या कामाने वेडे केले तो रात्र – रात्र जागत असे. डुलक्या आल्यातरी त्याचे काम चालू असे. प्रसिध्द चित्रकार व शिल्पकार मायकेल एंजलो हा आपल्या कामात इतका तल्लीन होत असे, की जबरदस्त पाठदुखीचा त्रास होऊनही तो अनेक दिवस व रात्री काहीही न खाता व न झोपता काम करत असे. त्याचे चित्र रंगवणे पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या पायातील मोजे काढले तेंव्हा त्या मोजाबरोबर त्याच्या पायाची चामडी सोलून निघाली. अलेक्झांडर द ग्रेट हा तर जखमी अवस्थेत अनेकदा रणांगणात हातघाईची लढाई खेळत असे. असे हे विजेते स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारच्या संकटांना खंबीरपणे तोंड देत. अनेक वेळा त्यांना अपयश येई, पण पुन्हा मागे जाऊन प्रयत्न करण्याचा ते लवचिकपणा दाखवत. जेंव्हा त्यांच्या चुका झाल्या व अपयश आले तेंव्हा त्यांनी परत सर्व गोष्टी एकत्र केल्या व प्रयत्न सुरू केले.

अशी माणसे आपले जीवन ही अनुभव घेण्याची शाळा व अपयश ही यशाकडे जाण्याची व सुधारण्याची संधी समजत असत. हेही खरे जेंव्हा अडथळे येतात व माघार घ्यावी लागते, तेंव्हा खूपच निराशा येते. अशावेळी खरे विजेते परिस्थितीचा नीट आढावा घेतात व पुन्हा नव्या ताकदीने व उत्साहाने प्रयत्न सुरू करतात. असो राजकारणात सत्तेवर कोण येतो हे मतदारावर अवलंबून आहे, परंतू नेता म्हणून कसे वागायचे हे तर आपल्या हातात आहे. त्यामुळे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी या अग्रलेखाचा विचार करावा एवढीच अपेक्षा…!
✍डॉ.अॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, जि. सोलापूर मो.९४२३३३७४८०

