एकाच चितेवर मृतदेह ठेवून पती-पत्नीवर करण्यात आले अंत्यसंस्कार

करमाळा(दि.५) : घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोर्टी (ता. करमाळा) येथे घडली आहे. युवराज लक्ष्मण शेरे (वय ३१) असे पतीचे नाव असून व रुपाली युवराज शेरे (वय २५) हे पत्नीचे नाव आहे.

याबाबत हकीकत अशी की, मयत युवराज शेरे हा आपली पत्नी, दीड महिन्यांची मुलगी, आई-वडील, भाऊ व भावजय यांच्यासोबत कोर्टी येथील शेरे वस्तीवर राहायला होते. ज्यादिवशी घटना घडली त्यादिवशी गुरुवारी (दि.३) कुटुंबातील इतर लोक बाहेर गेलेले होते. दुपारी चारच्या दरम्यान युवराज शेरे हा आपल्या पत्नी व मुलीसह घरात होता. दरम्यान पतीपत्नी मध्ये वादावादी झाली. हा वाद विकोपाला गेला व रागाच्या भरात युवराजने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. यानंतर आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याने पती युवराजने देखील घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
सायंकाळी साडेपाच- सहाच्या सुमारास युवराजच्या कुटुंबातील इतर लोक घरी आले. त्यावेळी बंद असलेल्या घरातून दीड महिन्यांच्या मुलीचा रडत असल्याचा आवाज आला. अनेकवेळा दरवाजा वाजवून, आवाज देऊन सुद्धा दरवाजा उघडत नसल्याने युवराजच्या वडिलांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. दरवाजा तोडल्यानंतर घरात प्रवेश केला तेव्हा सून रूपाली जमिनीवर निपचित पडली होती, मुलगा युवराज लोखंडी अँगलला फास घेऊन लटकत असल्याचे दिसले. तर शेजारीच लहान बाळ रडत असल्याचे विदारक दृष्य पाहून कुटूंबाला धक्का बसला.
यानंतर वडीलांनी करमाळा पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यानंतर त्यांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.४) सकाळी नऊच्या सुमारास शेरे यांच्या शेतात एकाच चितेवर मयत युवराज शेरे व त्याची पत्नी रुपाली शेरे यांचे शव ठेवून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोर्टी परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या संदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे करत आहेत. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील दीड ते दोन महिन्यांपासून युवराज शेरे हा घरात सतत चिडचिड करत होता. पत्नीबरोबर त्याचे सतत वाद सुरू होते. गुरुवारी झालेल्या वादात त्याचा संयम सुटला आणि मागचा पुढचा विचार न करता दीड महिन्यांच्या मुलीसमोरच पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर झालेल्या पश्चातापात त्याने स्वतःलाही संपविले.



