अल्पसंख्याकांच्या विविध मागण्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

करमाळा(दि.५): करमाळा विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच विविध कामांना निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भेटून निवेदन देण्यात आले.

ग्रामीण भागातील ज्या गावात दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नाही अशा गावांना जागा उपलब्ध करून द्यावी, कब्रस्तानाला ऑल कंपाऊंड व इतर भौतिक सुविधा, सुशोभीकरण करण्यासाठी निधी द्यावा, हजरत चाँद वली पाशा दर्गा आवाटी शरीफ यांना अ वर्ग दर्जा साठी प्रयत्न करावे, करमाळा शहरातील ईदगाह मैदान सुशोभीकरण करावे, मदरसा फैजुल कुराण नालबंद नगर या मदरसा मधील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, मुस्लीम समाज करिता सांस्कृतिक भवन शादी खाना, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी अल्पसंख्याक विभाग आणि ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने हे प्रश्न सोडविण्याचे ठोस आश्वासन ना. गोरे यांनी दिले.
यावेळी जमीर सय्यद, सचिन काळे, पत्रकार प्रफुल दामोदर, धन्यवाद इकबाल शेख, इम्तियाज पठाण, मुस्तकीम पठाण, जहाँगीर बेग, सोयल पठाण उपस्थित होते.




