स्व. सुखदेव साखरे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार बार्शीच्या कविता धावणे यांना जाहीर-
१६ सप्टेंबर ला पुरस्कार वितरण

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.७: राजुरी (ता. करमाळा) येथील श्री राजेश्वर विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक स्व. सुखदेव साखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘स्व. सुखदेव साखरे स्मृती पुरस्कार’ यावर्षी बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कविता दादाराव धावणे यांना जाहीर झाला आहे. येत्या १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता राजुरी येथे सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. राजेंद्र दास यांच्या हस्ते या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण होणार आहे.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकाचा दरवर्षी स्व. सुखदेव साखरे स्मृती पुरस्काराने गौरव करण्यात येतो. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि ११ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी पुरस्कार संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी यावर्षीच्या पुरस्काराची घोषणा केली.


स्व. सुखदेव साखरे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत राजुरी येथील श्री राजेश्वर विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक म्हणून विद्यालयाचे काम पाहिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या कार्याचा ठसा आजही विद्यालयाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. स्व. साखरे सरांचे अनेक विद्यार्थी आज समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून आपापल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत.
आदर्श मुख्याध्यापक म्हणून स्व. सुखदेव साखरे यांचे कार्याचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या मुख्याध्यापकाचा दरवर्षी या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.

यावर्षी मुख्याध्यापक कविता धावणे यांनी आपल्या 32 वर्षाच्या सेवेमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण केली, एक उपक्रमशील प्राचार्य म्हणून आपल्या मुख्याध्यापक पदाच्या कालावधीमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण केला याआधीही त्यांना विविध सामाजिक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

पुरस्कार निवडीच्या वेळी समितीतील सदस्य सोलापूर स्टडी सर्कलचे संचालक सतीश मोरे, विठ्ठल देशमुख, विक्रीकर अधिकारी तुकाराम जाधव, कृषी पर्यवेक्षक नानासाहेब साखरे, कृषी अधिकारी देवीदास सारंगकर, उद्योजक प्रवीण साखरे, कुंडलिक साखरे आदीजण उपस्थित होते.
कविता धावणे यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक होत असून, राजुरी येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभाकडे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांचे लक्ष वेधले आहे.अशी माहिती प्रा. डाॅ. चौधरी यांनी दिली.






