करमाळ्याचा पाणीप्रश्न अखेर मार्गी; नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

0

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष सहकार्याने ६६.५३ लाखांच्या दोन महत्त्वाच्या कामांना मंजुरी; करमाळकरांना दिलासा

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार विस्कळीत होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. दहीगाव येथील पंपहाऊसचा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत होती. मात्र आता करमाळकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या विशेष सहकार्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित दोन महत्त्वाच्या कामांना तब्बल ६६ लाख ५३ हजार रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे करमाळा शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे. नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड तसेच नगरपरिषदेतील सर्व नगरसेवकांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मंजुरी मिळाल्यानंतर नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांनी पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे आभार मानले.

सध्या करमाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहीगाव पंपहाऊसला ‘जेऊर’ सबस्टेशनवरून वीज पुरवठा केला जातो. मात्र जेऊर ते दहीगाव हे अंतर जास्त असल्यामुळे तांत्रिक बिघाड किंवा नैसर्गिक कारणांमुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होत होता. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता थेट दहीगाव येथील सबस्टेशनवरूनच पंपहाऊसला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या बदलासाठी नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी जेऊर, बार्शी आणि सोलापूर येथील महावितरण कार्यालयांमध्ये सातत्याने पाठपुरावा करून सर्व प्राथमिक परवानग्या मिळवल्या. अखेर या कामासाठी २९ लाख ९४ हजार ४८० रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

याशिवाय शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी मेन रोड परिसरात नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामालाही मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी ३६ लाख ५८ हजार ६०० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या नवीन पाईपलाईनमुळे संबंधित भागातील नागरिकांना वेळेवर आणि पुरेशा दाबाने पाणी मिळणार आहे.

“शहराचा विकास आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांना आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, या कामांसाठी उपनगराध्यक्ष अतुल फंड तसेच सर्व नगरसेवकांचे सहकार्य लाभले.” – नगराध्यक्षा मोहिनी सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!