करमाळ्यात १५ गोवंशीय जनावरांची सुटका-कत्तलीसाठी आणल्याचा संशय

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा ता.१८,:शहरातील मौलाली माळ परिसरात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे आणून बांधून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर करमाळा पोलिसांनी छापा टाकून १५ गोवंशीय जनावरांची सुटका केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास करमाळा पोलिस ठाण्याचे पथक मौलाली माळ येथे दाखल झाले. यावेळी घटनास्थळी काही व्यक्ती आढळून आल्या. चौकशीदरम्यान आम्ही गोसेवक असल्याचे सांगत संबंधित ठिकाणी गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आणून बांधून ठेवल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
छाप्यात जर्शी, खिलार व गिर जातीची एकूण १५ जनावरे जप्त करण्यात आली. यात जर्शी जातीची २ वासरे व ७ खोंड, खिलार जातीचे १ कालवड व २ खोंड तसेच गिर जातीचे १ कालवड व २ खोंड यांचा समावेश आहे. या जनावरांची अंदाजे किंमत सुमारे ६५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून जनावरांची सुटका केली. जनावरांना चारा-पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच जनावरांची देखभाल करण्यासाठी गोशाळेत ठेवण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

