जनमतातून कमल लकडे यांची कात्रज ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड

करमाळा, ता.३०: ग्रामविकासासाठी एकोप्याचा आदर्श घालून देत कात्रज ग्रामपंचायतीतील जनमतातून होणारी सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून कमल गोरख लकडे यांची नूतन सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या समन्वयातून आणि गावाच्या विकासाचा दूरदृष्टीने विचार करत झालेल्या या बिनविरोध निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जनमतातून सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होणे हे सहसा कठीण मानले जाते. मात्र कात्रज ग्रामस्थांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत गावाच्या हिताला प्राधान्य दिले आणि “गावाचा विकास महत्त्वाचा” हा संदेश देत ही निवडणूक बिनविरोध करून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही बाब प्रेरणादायी ठरणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
यापूर्वी जनमतातून निवडून आलेल्या माजी सरपंच सुनीता मनोहर हंडाळ यांचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र गावातील ज्येष्ठ मंडळी, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्रित चर्चा करून निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.
ही निवडणूक बिनविरोध करण्यात किरण कवडे, नागनाथ लकडे, बाळकृष्ण सोनवणे, मनोहर हंडाळ, मच्छिंद्र लकडे, दत्तात्रय धायगुडे, सोमनाथ पाटील, लतिस पाटील, शंकर माने, साहेबराव शिंदे, ज्ञानदेव लकडे आदी मान्यवरांनी विशेष पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, नूतन सरपंच कमल गोरख लकडे यांच्या निवडीबद्दल विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तसेच कात्रज गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
गावातील विकासकामांना गती मिळावी, ग्रामस्थांमध्ये सलोखा टिकून राहावा आणि कात्रज गाव प्रगतीच्या दिशेने पुढे जावे, यासाठी आम्ही सर्वमतभेद बाजुला ठेवून ही निवडणूक बिनविरोध केली.
–किरण कवडे नेता, कात्रज, तालुका करमाळा

