उजनी धरण पट्ट्यातील शेतीपंपांना आठ तास वीज पुरवठा करा – चिवटे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0

करमाळा(प्रतिनिधी):करमाळा तालुक्यातील उजनी धरण पट्ट्यातील गावांमध्ये शेतीपंपांसाठी केवळ दोन तास वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. ऊस, डाळिंब, केळी, चारा तसेच इतर नगदी पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने ती करपण्याच्या मार्गावर असून हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उजनी धरण पट्ट्यातील गावांना किमान आठ तास नियमित व अखंडित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.

अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेती धोक्यात

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात महावितरणकडून होत असलेल्या अपुऱ्या व अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने उत्पादनावर परिणाम होत असून जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उजनी धरण पट्ट्यातील गावांना किमान आठ तास नियमित व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासनस्तरावर पाठपुरावा

यावेळी गणेश चिवटे यांनी सांगितले की, उजनी धरण पट्ट्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ वीजपुरवठ्यापुरता मर्यादित नसून त्यांच्या अस्तित्वाशी निगडित आहे. या भागातील प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असून या विषयावर उद्या मुंबई येथे महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ बापू झोळ, वाशिंबे गावचे उपसरपंच अमोल पवार, अमोल भोईटे आणि अजित झोळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!