विद्यार्थी-युवकांच्या न्यायासाठी करमाळ्यात राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन -

विद्यार्थी-युवकांच्या न्यायासाठी करमाळ्यात राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

0

करमाळा | प्रतिनिधी : देशातील व राज्यातील विविध स्पर्धा परीक्षा, नोकरभरती प्रक्रिया आणि शैक्षणिक व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांविरोधात तसेच विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) करमाळा तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना, भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी तसेच विद्यार्थी-युवकांच्या प्रश्नांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई करून पारदर्शक परीक्षा व्यवस्था उभी करावी, अशी मागणी करण्यात आली.



यावेळी तालुकाध्यक्ष अमरजीत साळुंखे यांनी सांगितले की, विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांबाबत शासनाची भूमिका निराशाजनक आहे. विविध आंदोलनांनंतरही सरकारने ठोस निर्णय घेतलेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि गुणवत्तेचे संरक्षण करण्यासाठी तातडीने प्रभावी पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यभरात परीक्षा प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनांकडूनही विविध मागण्या पुढे येत आहेत.

करमाळा तहसील कार्यालयात तहसीलदारांकडे हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी उपस्थित होते.
सरकारने विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!