जातीवाचक शिवीगाळ करून दमबाजी – तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


करमाळा/ संदेश प्रतिनिधी
झरे येथे रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करून दमबाजी केल्याप्रकरणी धर्मराज घाडगे, अजय घाडगे व विजय घाडगे या तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तसेच दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी झरे येथील २१ वर्षीय तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील धर्मराज घाडगे हे रस्त्याचे काम करीत असून सदर रस्ता फिर्यादीच्या घराजवळून जात आहे. या रस्त्याच्या कामास फिर्यादीचा विरोध असल्याने त्यावरून वाद झाला. दि. ९ सप्टेंबर रोजी धर्मराज घाडगे यांनी जातीवाचक शिवीगाळ करून दमबाजी केली.

त्यानंतर दि. १७ सप्टेंबर रोजी अजय घाडगे यांनी थार वाहन माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला तसेच दगड फेकून मारल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. धर्मराज घाडगे, अजय घाडगे व विजय घाडगे या तिघांनी मिळून दोन वेळा जातीवाचक शिवीगाळ करून दमबाजी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!