केममध्ये ‘एक झाड लेकीसाठी’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

केम(संजय जाधव): गावाची स्वच्छता, सुंदरता आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेऊन सुरू करण्यात आलेल्या ‘आपले केम, स्वच्छ केम’ ग्रामस्वच्छता अभियानाचा सलग ११वा रविवार उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या अभियानाने आता केवळ ग्रामस्वच्छतेपुरते मर्यादित न राहता ‘स्वच्छ केम, सुंदर केम आणि हरित केम’ या व्यापक संकल्पनेकडे वाटचाल सुरू केली आहे.
अभियानाच्या ११व्या रविवारी ग्रामस्वच्छतेसोबतच ‘एक झाड लेकीसाठी’ हा अभिनव पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. करमाळा तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या हस्ते तसेच केम गावच्या लेकींच्या उपस्थितीत श्री तुळजाभवानी माता मंदिर परिसरातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
लेकीच्या नावाने एक झाड लावून तिच्या आठवणी, प्रेम आणि निसर्गाची सावली कायम जपावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. लेकीच्या नावाने लावलेले रोप भविष्यात मोठे वृक्ष होऊन पुढील पिढ्यांना सावली, शुद्ध हवा आणि पर्यावरणाचा वारसा देईल, असा संदेश यावेळी देण्यात आला.
यानंतर केम गावातील स्मशानभूमी परिसरात दिवंगत आई-वडिलांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलांना घडविले, त्यांच्या आठवणी चिरंतन जपण्यासाठी त्यांच्या नावाने लावण्यात आलेली झाडे भविष्यात समाजाला सावली देतील. त्यामुळे स्मशानभूमी परिसरातील हा उपक्रम कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचा भावनिक संगम ठरला.
या उपक्रमास तहसीलदार शिल्पा ठोकडे, निंभोरेचे सरपंच रवींद्र वळेकर, आमदार मोहिते पाटील यांचे पी.ए.ज्ञानेश पवार, केमचे ग्रामसेवक वैभव तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामसेवक वैभव तळेकर यांचे अभियानाला सातत्याने मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
अभियानात ग्रामस्थ, व्यापारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव, कुंकू कारखानदार, गोसेवक, डॉक्टर, शिक्षक तसेच ‘आपले केम, स्वच्छ केम’ अभियानातील सर्व सहकारी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सलग ११ रविवार सुरू असलेल्या या अभियानातून केममध्ये स्वच्छतेसोबतच सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन आणि भावनिक जिव्हाळ्याची नवी चळवळ उभी राहत आहे. ‘एक झाड लेकीसाठी’ तसेच दिवंगत आई-वडिलांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण या उपक्रमांमुळे स्वच्छतेला संवेदनशीलतेची आणि पर्यावरण संवर्धनाला माणुसकीची जोड मिळाली आहे.
केम गावातील ही एकजुटीची चळवळ अशीच कायम राहावी आणि स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गावाने नवनवीन आदर्श निर्माण करावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
