केम येथे ‘एक झाड लेकीसाठी’ उपक्रमातून  स्वच्छतेसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश;

केम(संजय जाधव): गावाच्या स्वच्छता, सुंदरता आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेऊन सुरू करण्यात आलेल्या ‘आपले केम, स्वच्छ केम’ ग्रामस्वच्छता अभियानाचा सलग ११ वा रविवार उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गेल्या अकरा रविवारांपासून सुरू असलेल्या या अभियानाने केवळ ग्रामस्वच्छतेपुरते मर्यादित न राहता आता ‘स्वच्छ केम, सुंदर केम आणि हरित केम’ या व्यापक संकल्पनेकडे वाटचाल सुरू केली आहे.

अभियानाच्या ११ व्या रविवारी ग्रामस्वच्छतेसोबतच ‘एक झाड लेकीसाठी’ हा अभिनव आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते तसेच केम गावच्या लेकींच्या उपस्थितीत श्री तुळजाभवानी माता मंदिर परिसरातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

घराला घरपण देणाऱ्या लेकीच्या नावाने एक झाड लावावे आणि त्या झाडासोबत तिच्या आठवणी, प्रेम व निसर्गाची सावली कायम जपली जावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. लेकीच्या नावाने लावलेले रोप भविष्यात मोठे वृक्ष होऊन पुढील पिढ्यांना सावली, शुद्ध हवा आणि पर्यावरणाचा वारसा देईल, असा संदेश यावेळी देण्यात आला.

यानंतर केम गावातील स्मशानभूमी परिसरात दिवंगत आई-वडिलांच्या पवित्र स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलांना घडवले, त्यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या नावाने लावण्यात आलेली ही झाडे भविष्यात समाजाला सावली देतील. त्यामुळे स्मशानभूमी परिसरातील वृक्षारोपण हा कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचा भावनिक संगम ठरला.

या उपक्रमास तहसीलदार शिल्पाताई ठोकडे, श्री. ज्ञानेश पवार (मा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे स्वीय सहाय्यक), निंभोरेचे लोकनियुक्त सरपंच श्री. रवींद्रजी वळेकर, केमचे ग्रामसेवक श्री. वैभव तळेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ग्रामसेवक वैभव तळेकर यांचे या अभियानाला सातत्याने मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या अभियानात ग्रामस्थ, व्यापारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव, कुंकू कारखानदार, गोसेवक, डॉक्टर, शिक्षक तसेच ‘आपले केम, स्वच्छ केम’ अभियानातील सर्व सहकारी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सलग ११ रविवार सुरू असलेल्या या अभियानातून केम गावात स्वच्छतेबरोबरच सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन आणि भावनिक जिव्हाळ्याची नवी चळवळ उभी राहत आहे. ‘एक झाड लेकीसाठी’ आणि दिवंगत आई-वडिलांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण या उपक्रमातून स्वच्छतेला संवेदनशीलतेची आणि पर्यावरणाला माणुसकीची जोड मिळाली आहे.

एकजुटीची ही मूठ अशीच घट्ट राहावी आणि केम गावाने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व सामाजिक उपक्रमांतून नवनवीन आदर्श निर्माण करावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!