कै. डॉ. सुभाष महाजन यांच्या स्मरणार्थ करमाळा, जेऊर येथे मोफत आरोग्य शिबिरे; ३०० हून अधिक रुग्णांना लाभ

करमाळा | संदेश प्रतिनिधी

कै. डॉ. सुभाष महाजन यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी करमाळा व जेऊर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दोन्ही शिबिरांमध्ये ३०० हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना आरोग्यसेवेचा लाभ देण्यात आला. दिवंगत डॉ. सुभाष महाजन यांच्या सेवाभावी कार्याचा वारसा जपण्याच्या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

१६ नोव्हेंबर २०२६ रोजी जेऊर येथे, तर १८ नोव्हेंबर २०२६ रोजी करमाळा येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. करमाळा येथे सुमारे २००, तर जेऊर येथे १०० हून अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये दंत तपासणी, दंत एक्स-रे, आवश्यक इंजेक्शन, आधुनिक थ्रीडी स्कॅनिंग तसेच त्वचा व केसांच्या विविध समस्यांची तपासणी अशा सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.

करमाळा येथील शिबिरात डॉ. सरोज महाजन, डॉ. ऋषिकेश देशमुख, डॉ. अक्षय पुंडे, डॉ. वसंत पुंडे, डॉ. श्रीराम परदेशी, डॉ. संदीप महाजन, डॉ. अनुष्का आटोळे आणि डॉ. सानिया शेख यांनी रुग्णांची तपासणी केली.

तर जेऊर येथील शिबिरात डॉ. सुभाष सुराना, डॉ. पराग दोषी, डॉ. संदीप महाजन, डॉ. ऋषिकेश देशमुख, डॉ. सिद्धी दोषी, डॉ. अनुष्का आटोळे आणि डॉ. अनुराधा केकान यांनी सहभाग घेतला.

३०० हून अधिक नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देत दिवंगत डॉ. सुभाष महाजन यांच्या स्मृतींना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. रुग्णसेवेच्या माध्यमातून वाहिलेली ही श्रद्धांजली त्यांच्या सेवाभावी कार्याची आठवण करून देणारी ठरली .

error: Content is protected !!