दीपस्तंभ... - Saptahik Sandesh

दीपस्तंभ…

ज्या पोलिस स्टेशनचे नाव घेताच भल्याभल्यांच्या मनात धडकी भरते… त्या पोलिस स्टेशनच्या आवारात आपण आज सन्मानाने, बिनधास्तपणे जातोय आणि विशेष म्हणजे चांगल्या कार्यासाठी जातोय हीच मुळात अभिमानाची बाब !
खरंतर, महिला दक्षता समितीत सामिल झाल्यापासून खूप वर्षांनी माझ्याही आयुष्यात आत्मविश्वास पुन्हा डोकावलाय… वाटतेय , चला या निमित्ताने आदरणीय P. I. कोकणे साहेबांसारखा खंबीर आणि हक्काचा भाऊराया आपल्या पाठीशी आता कोणत्याही क्षणी सक्षमपणे उभा आहे…”

आपल्या आसपास असणाऱ्या पिडित /अत्याचारित महिला , मुलींच्या समस्या आपल्या पातळीवरून पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने सोडवता आल्या तर सोडवाव्यात.. त्याचबरोबर आपल्या आसपास होणारे , बालविवाह, स्त्रीभृणहत्या, एकतर्फी प्रेमातून निर्माण झालेल्या समस्या इ. समस्या संबंधितांचे उद्बोधन करून टाळाव्यात हा या महिला दक्षता समिती स्थापन करण्यामागचा मूळ उद्देश… त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील महिलांना यामधे स्थान देण्यात आलेय….
समाजातील पिडित महिला/मुलींच्या बाबतीत बोलायचे झाले तर… त्यांची कधी कधी अशी अवस्था असतें की, खूप बोलायचं असतं पण बोलता येत नाही… मन इतके घट्ट मिटलेले असते की ते जोर लावूनही खोलता येत नाही…आणि मनाच्या त्या मिट्ट काळोखाच्या घरामध्ये काही नकोशा आठवणींचा कचरा सगळीकडे अस्ताव्यस्त पसरलेला असतो …

हा कचरा कधी उपेक्षा, अन्याय, अत्याचाराचा तर कधी अवहेलना, नकार किंवा शारीरिक/मानसिक घावांचा! आणि मग अशा ढवळलेल्या मनामधे खूप खळबळ माजते… दुःखाचे कढ सोसून सोसून या ज्वालामुखीला शांत करण्यासाठी एक निर्दयी क्षण असाही येतो की तो त्या पिडित स्त्रीच्या/ मुलीच्या आशावादाचा बळी घेतो आणि तिची पावले आत्महत्या करण्यासाठी कधी होकार देतात हे तिला देखील कळत नाही… तिथेच दबतात तिची गाऱ्हाणी आणि चितेतून येते एक किंकाळी…जे अनेक कान ऐकू शकत नाहीत…

राहून राहून आयुष्यात विस्तवाशीच खेळावे लागल्यामुळे आणि आपल्या आसवांशी एकटे आपणच बोलल्यामुळे ‘तिच्या’ मनावर पापुद्रे चढ़त जातात, अक्षरक्ष: निराशेची काजळी जमा होते. अशावेळी ‘ती’ चा संभाव्य धोका, नुकसान टाळण्यासाठी आपण एक ‘माणूस’ म्हणून परिस्थितीने हतबल झालेल्या आपल्या या भगिनीची,मुलीची मदत करून आणि महिला दक्षता समिती सदस्य म्हणून ‘ती’ च्या जीवनाला पुन्हा हसतं खेळतं करून ‘ती’ च्या आयुष्यामध्ये नवीन रंग नक्कीच भरू शकतो.. पोलिस प्रशासनाच्या मदतीने त्यांच्या आत्मविश्वासाला कणखर बनवू शकतो… कमीतकमी या निमित्ताने आपलाही जिवंत असण्याचा पुरावा तरी पुढील पिढीस मिळेल… आणि महिला दक्षता समितीतील माझ्या बहुसंख्य सख्या जोमाने हे समाजकार्य करत आहेत हे विशेष!…
महिला दक्षता समितीतील सदस्यांपैकीच मी एक महिला प्राथमिक शिक्षिका सदस्य ! खरंतर, शिक्षक म्हणून प्रत्येक गुरुंची अपेक्षा असते, आपला विद्यार्थी वाया जाऊ नये, त्याचे जीवन उत्तरोत्तर फुलत राहावे… त्या दृष्टीने तो आपल्या विद्यार्थ्यांच्या मनघटात मूल्यसंस्काराचे बीज पेरत असतो … तरीही किशोरवयीन विदयार्थ्यांचे वय हे एका अर्थी वाहवत जाण्याचे वय ! …

त्यामुळे या वयात त्यांना योग्य दिशा, मार्गदर्शन, संस्कार आणि धाक मिळणे गरजेचे असते. दिशा, मार्गदर्शन, संस्कार तर शाळेत शिक्षक, घरी पालक करतच असतात पण त्याचबरोबर अशावेळी ‘धाक’ ही तितक्याच ताकतीचा असणे आवश्यक आहे. आणि हा ‘ धाक’ आपल्या करमाळा पोलिस प्रशासनाचा नक्कीच आहे ही अभिमानाची बाब!
त्यामुळे महिला दक्षता समिती च्या माध्यमातून मी माझ्या शाळेतील किशोरवयीन विद्यार्थ्यांना मुलींची छेडछाड , मुलींवर अन्याय, अत्याचार केल्यामुळे होणाऱ्या कारवाईची ,भविष्यातील संभाव्य धोक्याची, पोलिसी खाक्या काय असतो आणि पिडित विदयार्थीनींच्या पाठीशी आदरणीय कोकणे साहेबांचे पोलिस प्रशासन कसे खंबीरपणे उभे आहे या विषयी सविस्तर माहिती देत असते… जेणेकरून भविष्यात त्यांची पावले चुकीच्या दिशेने वळणार नाहीत… त्याचबरोबर स्त्रीभृण हत्या, बालविवाह , हुंडाबळी याविषयीही मी त्यांचे प्रबोधन तळमळीने करत असते… कारण हीच उद्याची, जबाबदार पिढी आहे…

सध्या घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याइतकेच भविष्यात होणारे गुन्हे रोखणे,त्या गुन्हयांपासून पुढील पिढीला वाचवणे हे ही माझ्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे…आणि एक शिक्षक, समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून मी ही यासाठी प्रयत्न करतेय… ही समाधानाची बाब! महिला/ मुलींवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या दुर्जन नराधमांना तुडवून मारण्याइतपत सक्षम असा अवतार आता आदरणीय कोकणे साहेबांच्या रूपाने महिला,मुलींच्या पाठीशी उभा आहे.

आदरणीय कोकणे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या या स्तुत्य कार्यासाठी मला कुठेतरी वाचलेल्या दोन ओळी आठवतात …
“ताफ्यात लष्कराच्या तोफा हव्या कशाला?
बाजीप्रभू प्रमाणे सरदार पाहिजे बस्स! …”
चला तर मग … आता समाजातील पिडित महिला व मुलींनी न भिता महिला दक्षता समितीतील सदस्यांशी संपर्क साधून ‘दीपस्तंभ’ रूपी आपल्या पोलिस प्रशासनाचे सहकार्य मिळवूयात…. आणि आनंदी जीवन जगूयात!….

•सौ.शगुफ्ता शेख (हुंडेकरी)
जि.प. प्रा. केंद्रशाळा पोथरे
ता. करमाळा जि. सोलापूर

Yash collection karmala clothes shop
Sonaraj metal and crockery karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!