अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचे निधन
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचे निधन झाले आहे. हा अपघात १८ जुलैला सायंकाळी साडेचार वाजता करमाळा – सालसे रस्त्यावर पांडे येथील वीर वस्ती जवळ घडला आहे.
या प्रकरणी हनुमंत तुकाराम शिंदे (रा. हिवरे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की १८ जुलैला सकाळी १० वाजता माझ्या आत्याच्या वर्षश्राध्दचा कार्यक्रम असल्यामुळे व त्याचा बाजार भरण्यासाठी माझा भाऊ नागन्नाथ तुकाराम शिंदे व आत्याचा मुलगा बाळासाहेब शिवदास चव्हाण (रा. हिवरे) हे दोघे होंडा कंपनीच्या मोटारसायकलवरून करमाळा येथे गेले होते.
तेथून ते सायंकाळी ४ वा. २० मि. परत येत असताना वीर वस्तीजवळ अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. त्यात माझा भाऊ नागन्नाथ तुकाराम शिंदे याचे निधन झाले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.