केम येथील व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक-पोलिसांत गुन्हा दाखल

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२८: केम (ता. करमाळा) येथील औषधे व खत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी संबंधितांविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात केम येथील व्यावसायिक वृषाली प्रवीण दगडे यांनी येवला (जि. नाशिक) येथील अॅग्री सीड्स अँड पेस्टिसाईड्स दुकानाशी खत व औषध खरेदीचा व्यवहार केला होता. सुरुवातीला आरोपींनी विश्वास संपादन करत चांगल्या प्रकारे व्यवहार केल्याने त्यांच्यावर विश्वास बसला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कृषी औषध पुरवठ्याचे आमिष दाखवत ४५ लाख रुपये बँक खात्यामार्फत पाठवूनही संबंधितांनी मालाचा पुरवठा केला नाही. वेळोवेळी फोन व प्रत्यक्ष भेटीद्वारे विचारणा करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाहीत.
काही रक्कम ऑनलाइन व्यवहाराद्वारे पाठविण्यात आल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, संबंधितांकडून औषधे पाठविण्याचे आश्वासन दिले जात होते; मात्र प्रत्यक्षात माल न मिळाल्याने फसवणूक झाल्याचा संशय अधिक बळावला. या व्यवहारात लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

