ग्राहक न्यायमंचातील लढवय्ये व ज्येष्ठ व्यापारी : कांतीलाल  बलदोटा यांचे निधन -

ग्राहक न्यायमंचातील लढवय्ये व ज्येष्ठ व्यापारी : कांतीलाल  बलदोटा यांचे निधन

0

करमाळ/संदेश प्रतिनिधी

करमाळा, ता.३०: – अन्यायाविरोधात कायदेशीर लढा देत ग्राहक न्यायमंचात बँके विरोधातही विजय मिळवणारे  तसेच, निवडक किराणा मालाचे व्यापारी, शिस्तप्रिय व हसतमुख व्यक्तिमत्त्व कांतीलाल उत्तमचंद बलदोटा (वय ७९) यांचे दि. २४ मे २०२६ रोजी  निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी रजनी कांतीलालजी बलदोटा, मोठे सुपुत्र सतीश कांतीलाल बलदोटा (प्रिंटींग व्यवसाय), धाकटे सुपुत्र संतोष कांतीलाल बलदोटा (उद्योजक), मोठी सून सौ. स्नेहा सतीश बलदोटा, छोटी सून सौ. सुवर्णा संतोष बलदोटा, मोठी कन्या सौ. सुजाता सुनील बोरा (इंदापूर), छोटी कन्या सौ. स्वाती अनिल श्रीश्रीमाळ (कोल्हापूर) तसेच नातवंडे अमृता, नम्रता, यश, सुयश बलदोटा, विकेश, हर्ष बोरा व अक्षय श्रीश्रीमाळ असा मोठा परिवार आहे.

           दि. २० ऑगस्ट १९४६ रोजी अंजनडोह येथे जन्मलेल्या कांतीलाल बलदोटा यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले होते. किराणा व्यवसायात प्रामाणिकपणा, वेळेचे महत्त्व आणि ग्राहकांशी विश्वासाचे नाते यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. निवडक किराणा मालाचे व्यापारी म्हणून ते परिसरात प्रसिद्ध होते.
कांतीलाल बलदोटा यांचे मोठे बंधू भागचंद बलदोटा, धाकटे बंधू सुभाषचंद बलदोटा, तसेच चुलत बंधू कचरदास बलदोटा ,दोन बहिणी कंचनबाई धोका (कुर्डूवाडी) व लिलाबाई कोठारी (पुणे) असा बलदोटा परिवार  कायम एक विचाराने व जिव्हाळ्याने राहीला आहे.
ते अत्यंत  शिस्तबद्ध जीवन जगले.पहाटे पाच वाजता उठणे,बारमाही थंड पाण्याने स्नान, देवदर्शन, वृत्तपत्र वाचन आणि शेतात फेरफटका हा त्यांचा आयुष्यभराचा दिनक्रम होता. वेळेचे काटेकोर पालन, स्पष्टवक्तेपणा आणि कायम हसतमुख चेहरा यामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते.
         

अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द त्यांच्या स्वभावातच होती. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी दिवाणी न्यायालय व ग्राहक न्यायमंचात सुमारे १० ते १२ प्रकरणे लढवली आणि विशेष म्हणजे सर्वच्या सर्व प्रकरणांत विजय मिळवला. यातील एक विशेष उल्लेखनीय प्रकरण म्हणजे सन १९९९ साली मोठा मुलगा सतिश ला व्यवसायासाठी  बँकेकडे कर्ज मागणी केली असता विलंब व नकार मिळाला. त्यानंतर त्यांनी थेट बँकेविरोधात ग्राहक न्यायमंचात लढा दिला. अखेरीस निकाल त्यांच्या बाजूने लागला आणि बँकेला तब्बल ५२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्या काळात हा निकाल परिसरात चर्चेचा विषय ठरला होता.
“शिस्त, न्यायासाठी लढण्याची वृत्ती आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व” म्हणून कांतीलालजी बलदोटा यांची ओळख कायम स्मरणात राहील, अशा भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!