केम-टेंभुर्णी रस्त्याची शेतकऱ्याकडून अडवणूक – सार्वजनिक वाहतूक ठप्प – केम ग्रामपंचायतीची उपमुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी

केम (संजय जाधव): सावडी ते वेणेगाव या ७१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे ‘HAM’ योजनेअंतर्गत काम सुरू असून हा मार्ग कोंढेज, निंभोरे, मलवडी, केम, ऊपळवाटे, कन्हेरगाव व दहिवली मार्गे वेणेगावपर्यंत जोडला जात आहे. या रस्त्यालगत केम गावठाण हद्दीतील शेतजमीन मालकांनी रस्त्याच्या कामास विरोध करत रस्त्यावर मोठे दगड व खड्डे पाडून वाहतूक बंद केली आहे. यामुळे केम परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी करत प्रश्न न सुटल्यास संपूर्ण केम गाव बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणी केम ग्रामपंचायतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

एसटी सेवा बंद; विद्यार्थी, शेतकरी व प्रवाशांचे हाल
संबंधित शेतकऱ्यानी रस्त्यावर मोठे दगड टाकून मागील महिनाभरापासून वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे केम–टेंभुर्णी एसटी सेवा बंद पडली असून विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गाचा प्रश्न ऐरणीवर
हा मार्ग निवृत्तीनाथ महाराजांच्या परतीच्या पालखी सोहळ्यासाठीही महत्त्वाचा मानला जातो. त्र्यंबकेश्वरकडे परतताना पालखी याच मार्गाचा वापर करते. पालखीसोबत हजारो वारकरी केम येथे मुक्कामी असतात. आषाढी सोहळा जवळ आला असताना रस्ता बंद राहिल्यास वारकऱ्यांची गैरसोय होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आषाढी सोहळा अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला असताना रस्ता बंद राहिल्यास पालखी कोणत्या मार्गाने जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे धार्मिक व सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनची तोडफोड
दरम्यान, १४ मे २०२६ रोजी रात्री केम गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची मुख्य पाईपलाईन फोडण्यात आल्याची घटना घडली. त्यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान झाले असून गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.

तातडीने कारवाईची मागणी
केम ग्रामपंचायतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संबंधितांवर योग्य ती कारवाई करून बंद करण्यात आलेला सार्वजनिक रस्ता त्वरित खुला करण्याची मागणी केली आहे. तसेच तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, भूमि अभिलेख विभाग व पंचायत समिती यांनी संयुक्तपणे हस्तक्षेप करून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
गाव बंद व आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास संपूर्ण केम गाव एक दिवस बंद ठेवण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

