वडशिवणे येथे स्व. जगदाळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गुणवंतांचा सन्मान

करमाळा (प्रतिनिधी):वडशिवणे (ता. करमाळा) येथे स्व.ह.भ.प. पुंडलिक (नाना) जगदाळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त जगदाळे परिवाराकडून कीर्तन सेवेसह गावातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमानिमित्त ह.भ.प. कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली पाटील महाराज (दहिवली) यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन आयोजित करण्यात आले. सुमारे २०० ते २५० वारकरी व भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला. नानांच्या अध्यात्मिक परंपरेची आठवण जपत वडशिवणे व परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कीर्तनात ज्ञानेश्वर माऊली पाटील महाराज यांनी अध्यात्मिक समाधानासाठी मन एकाग्र ठेवण्याची आवश्यकता, अखंड नामस्मरणाचे महत्त्व आणि संतविचारांचे आचरण यावर प्रभावी निरूपण केले. त्यांच्या ओघवत्या वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. दहिवली तसेच वडशिवणे परिसरातील भजनी मंडळांनी भजनसेवेद्वारे कार्यक्रमाची शोभा वाढविली.

दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिकासह गौरव
ह.भ.प. पुंडलिक (नाना) जगदाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षण, पर्यावरण आणि समाजसेवेचा संदेश देणारा विशेष सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला. नानांच्या चिरंजीवांनी वडिलांचा शैक्षणिक व सामाजिक वारसा जपत अजितदादा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ₹२,००१, ₹१,५०१ आणि ₹१,००१ अशी रोख पारितोषिके प्रदान केली. तसेच शाल, श्रीफळ, सुपारीचे रोप आणि प्लास्टिकमुक्त समाजाचा संदेश देण्यासाठी कापडी पिशवी भेट देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
‘प्रेरणादीप सन्मान पुरस्कार–२०२६’ने गुणवंतांचा गौरव
याच कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात विशेष यश संपादन केलेल्या गावातील गुणवंतांचा ‘प्रेरणादीप सन्मान पुरस्कार–२०२६’ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये गावाचे पोलीस पाटील हनुमंत देवकर आणि सरस्वती भागवत यांनी एलएल.बी., वैष्णवी पन्हाळकर, जान्हवी व्हरे आणि जान्हवी सरडे यांनी बी. फार्मसी, श्रुती जगदाळे यांनी एम. फार्मसी, तर श्रवण जगदाळे यांनी बीसीए पदवी पूर्ण केल्याबद्दल तसेच इतर गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला.
सर्व गुणवंतांना ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पाटील महाराज, स्व.ह.भ.प. पुंडलिक (नाना) जगदाळे यांच्या पत्नी, त्यांचे चिरंजीव तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सुपारीचे रोप आणि ‘प्रेरणादीप सन्मान पुरस्कार–२०२६’ प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास संजय मामा माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक-सचिव रोहन टोणपे, जिजाऊ इन्स्टिट्यूट, कालठाणचे आधारस्तंभ भास्कर गटकुळ, अजितदादा माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष गोरख पारखे, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद तसेच वडशिवणे गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोरे सर आणि जयप्रकाश जाधव यांनी ओघवत्या व प्रभावी शैलीत केले.

