आदर्श शाळा पुरस्काराने राजाभाऊ तळेकर विद्यालयाचा सन्मान

केम(संजय जाधव): केम येथील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजाभाऊ तळेकर विद्यालयाची सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सेवक सहकारी संस्था, बाळे (सोलापूर) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘आदर्श शाळा पुरस्कार’ साठी निवड झाली आहे. निवडीबाबतचे अधिकृत पत्र विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज (विनोद) तळेकर यांना प्राप्त झाले आहे.

या पुरस्काराचे वितरण ५ जुलै २०२६ रोजी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील रायगड लॉन्समध्ये आयोजित भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राजाभाऊ तळेकर विद्यालयाने यापूर्वीही विविध पुरस्कार मिळवत शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमात विद्यालयाने टप्पा-१ मध्ये जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक, तर टप्पा-२ मध्ये करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली होती.
शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्यांची जपणूक करणारे शैक्षणिक संकुल म्हणून विद्यालयाची केम व परिसरात ख्याती आहे. बोर्ड परीक्षांचे नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक सहली, विविध गुणदर्शन उपक्रम, पालक संवाद तसेच क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यश यामुळे विद्यालयाची सर्वांगीण प्रगती लक्षवेधी ठरली असून, याच कार्याची दखल घेत पुरस्कार समितीने विद्यालयाची निवड केली असल्याचे सांगण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष महेश तळेकर, सचिव तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज (विनोद) तळेकर, संस्थेचे सदस्य, श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केम ग्रामस्थांनी विद्यालयाच्या या यशाचे स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


