करमाळ्याच्या मायाळू “आक्का” हरपल्या… -

करमाळ्याच्या मायाळू “आक्का” हरपल्या…

0

करमाळा: काही व्यक्ती या केवळ आपल्या कुटुंबापुरत्या मर्यादित राहत नाहीत; त्या संपूर्ण गावाच्या, शहराच्या आणि समाजाच्या मनात आपुलकीचं स्थान निर्माण करतात. करमाळा शहरासाठी सुमित्रा बाळासाहेब घोलप(अक्का) म्हणजे अशीच एक प्रेमळ, कणखर आणि संस्कारांची सावली होत्या. त्यांच्या अकस्मात जाण्याने केवळ घोलप परिवार नव्हे, तर संपूर्ण करमाळा शहर एका मायाळू व्यक्तिमत्त्वाला मुकला आहे.

सासर आणि माहेर एकाच गावात असणं, त्याच गावात स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्त्व निर्माण करणं आणि समाजात आदराचं स्थान मिळवणं हे सहज शक्य नसतं. मात्र सुमित्रा आक्कांनी हे आपल्या संयम, प्रेम, कष्ट आणि सामाजिक जाणीवेच्या जोरावर साध्य करून दाखवलं.
करमाळ्यातील प्रतिष्ठित वांगडे परिवारातील  कै.अंबादास वांगडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या.  दिवंगत दत्तात्रय अंबादास वांगडे तसेच प्रतिष्ठित व्यापारी भारत वांगडे, शिवशंकर वांगडे, ॲड.सुधाकर वांगडे आणि बाळासाहेब वांगडे हे त्यांचे बंधू. माहेर आणि सासर दोन्हीकडे त्यांनी आपुलकीची  आणि जिव्हाळ्याची नाती जपली.
१५ मे १९४७ रोजी जन्मलेल्या सुमित्रा आक्कांचा काळ हा महिलांच्यादृष्टीने  शिक्षणाकडे फारसं गांभीर्याने पाहिला जाणारा काळ नव्हता. तरीही त्यांनी जुन्या मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्या काळात हे शिक्षण म्हणजे एक मोठं पाऊल होतं. त्यांच्यातील समजूतदारपणा, व्यवहारज्ञान आणि नेतृत्वगुण याच शिक्षणातून अधिक बळकट झाले.
त्यांचे पती बाळासाहेब घोलप हे अत्यंत कर्तबगार, हुशार आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व होते. सन १९९१ मध्ये करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीतनागरिक संघटनेचे प्राबल्य आसताना ते अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९६ मध्येही त्यांनी नगरसेवकपद भूषवलं. २००१ पर्यंत त्यांनी नगरसेवक म्हणून काम करत जनतेशी घट्ट नातं निर्माण केलं.
परंतु २६ जुलै २००५ रोजी बाळासाहेब घोलप यांचं आकस्मिक निधन झालं आणि संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या क्षणी सुमित्रा आक्कांवर मोठी जबाबदारी येऊन पडली. मात्र त्यांनी खंबीरपणे संसार सावरला. त्यांना मुलांचा मोठा आधार लाभला. नितीन घोलप, संतोष घोलप आणि विजय घोलप या तिन्ही मुलांनी वडिलांचे संस्कार जपत कुटुंब एकसंघ ठेवले. त्यांच्या भगिनी वंदना चव्हाण यांनीही कायम आपुलकीची साथ दिली.
२००६ मध्ये मुलांनी सुमित्रा आक्कांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. जनतेनेही त्यांच्यावर भरभरून विश्वास दाखवला. त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि पुढे करमाळा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी तब्बल पाच वर्ष समर्थपणे सांभाळली. त्यांचा स्वभाव शांत, संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा होता. त्यांनी राजकारणात कधी कटुता निर्माण केली नाही; उलट लोकांमध्ये विश्वास आणि जिव्हाळा निर्माण केला.
२०११ ते २०१६ या काळातही त्यांनी नगरसेविका म्हणून पुन्हा काम केलं. पुढे त्यांनी नव्या पिढीला संधी दिली. आज त्यांच्या सुनबाई सौ. लता विजय घोलप नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून बांधकाम समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. हा वारसा केवळ राजकीय नाही, तर सामाजिक आणि संस्कारांचा आहे.
सुमित्रा आक्का म्हणजे मायेचं दुसरं नाव होतं. कष्टातून परिवार उभा करणं, सर्वांना आधार देणं, धार्मिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहणं, संप्रदायाला सहकार्य करणं, नाती जपणं आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणं — हे त्यांचं आयुष्यभराचं कार्य होतं. त्यांनी मुलं, सुना आणि नातवंडांना केवळ वाढवलं नाही, तर संस्कारांची श्रीमंती दिली.
अवघ्या तीन वर्षांपूर्वी त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. संपूर्ण परिवार आनंदात होता. पण अवघ्या तीन वर्षांतच आक्कांचं जाणं सर्वांच्या मनाला चटका लावून गेलं. त्यांचा वाढदिवस १५ मे रोजी असतानाच त्या १३ मे च्या रात्री गेल्या याची हुरहुर सर्वांनाच आहे.
आज करमाळा शहर एका अशा मातृछत्राला मुकलं आहे, ज्या केवळ घोलप परिवाराच्या नव्हत्या, तर संपूर्ण शहराच्या “पालक माता” होत्या. त्यांची माया, त्यांचं हसतमुख व्यक्तिमत्त्व, त्यांचा जिव्हाळा आणि लोकांना जोडून ठेवण्याची ताकद कायम स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

*डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे*, करमाळा.मो.न 9011355389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!