तालुक्यातील दुग्ध उत्पादकांनी एकजूट करावी – विविध योजनांसाठी मदत करू – आ.देशमुख

करमाळा (दि.१२) : करमाळा तालुक्यातील दुग्ध उत्पादकांनी एकजूट करावी, विविध शासकीय योजनांसाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन आमदार सुभाष देशमुख यांनी करमाळा येथील कार्यक्रमात दिले.
लोकमंगल को.ऑप बँक लि.,सोलापूर व दूध डेअरी चेअरमन असोसिएशन करमाळा व छत्रपती दूध संकलन व शीतकरण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा स्नेहसंवाद मेळावा संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, करमाळा तालुका जिल्ह्यातील सर्वाधिक दुग्ध उत्पादन करणारा तालुका व्हावा याकरिता सर्वांनी एकजूट होऊन प्रयत्न करावेत,दुधापासून प्रक्रिया करून विविध दुग्धजन्य पदार्थ तयार करावेत, लोकमंगल बँकेच्या विविध महामंडळाच्या (व्याज परतावा) योजनांचे तसेच फूड प्रोसेसिंग योजनेचा लाभ देऊन तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील सर्वतोपरी मदत करण्यास मी तयार आहे असे मत व्यक्त केले. तसेच दूध संस्था चालकांनी पशुखाद्य निर्मिती करून शेणखत तयार करून, गोमूत्र वर प्रक्रिया करून त्याची विक्री करून आपल्याकडील विविध दूध उत्पादक यांचे दुधाचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना मदत करून त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी लोकमंगल बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी मेळाव्यास उपस्थित सर्व दूध संकलन चेअरमन, संस्थाचालकांसमवेत संवाद साधत दुग्ध व्यावसायिकांना व्यवसाय वाढीबाबत मार्गदर्शन केले.तसेच दूध उत्पादन वाढीसाठी बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देऊन आर्थिक सक्षम करण्याची ग्वाही दिली. प्रातिनिधिक स्वरुपात दूध संकलन केंद्र चालकांना बँकेच्या वतीने अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत मंजूर झालेल्या कर्जाचा चेक वितरण करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक श्री अजिंक्य पाटील व शिवाजी पाटील ( छत्रपती दूध संकलन केंद्र), श्री दिपक देशमुख (लोक विकास डेअरी चेअरमन), श्री महेश चिवटे (शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख), श्री दत्तात्रय आडसुळ (मा.उपसभापतीमार्केट कमिटी करमाळा), लोकमंगल बँकेचे व पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी तसेच तसेच करमाळा तालुक्यातील दुग्ध संकलन केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




